एफएमसीजी कंपनी करणार विस्तार : सरकारचे मानले आभार
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
खाद्य प्रक्रिया उद्योग विस्तारासाठी नेस्ले इंडिया कंपनीला पीएलआय योजनेअंतर्गत फळे, भाज्या प्रक्रिया उद्योगाकरीता मंजुरी मिळाली असल्याची माहिती आहे. जलदरितीने विकल्या जाणाऱया ग्राहकोपयोगी वस्तूंच्या निर्मितीमध्ये नेस्ले इंडियाचा वाटा मोठय़ा प्रमाणात आहे.
भारतातही त्यांच्या उत्पादनांना लोकप्रियता वाढते आहे. नेस्ले इंडियाने फळे व भाज्यांच्या प्रक्रिया उद्योगाकरिता पीएलआय योजनेअंतर्गत (प्रोडक्ट लिंकड् इन्सेंटीव्ह) लाभ मिळवून देण्याबाबत भारत सरकारकडे अर्ज दाखल केला होता. 7 डिसेंबरला सरकारने त्यांच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यामुळे कंपनीला आपल्या उद्योगाला अधिक चांगल्या रितीने व गतीने भारतात विस्तार करणे शक्य होणार आहे. जून 2021 मध्ये कंपनीने भारत सरकारकडे पीएलआय योजनेचा लाभ मिळावा यासाठी अर्ज दाखल केला होता.
कंपनीची योजना
कंपनी रेडी टू इट, रेडी टू कुक तसेच प्रक्रियायुक्त फळे त्याचप्रमाणे भाज्यांच्या उद्योगात कार्यरत आहे. पीएलआय योजनेंतर्गत कंपनीला सरकारने एक अर्थाने मोठी संधी दिली असल्याचे कंपनीने म्हटले आहे. यायोगे आपल्या खाद्य प्रक्रिया उद्योगाला निश्चित अशी दिशा देणे शक्य होणार असून या अंतर्गत याचा लाभ शेतकऱयांना करवून देण्यासाठी कंपनी प्रयत्नरत असणार आहे. उद्योग वाढीसोबत कंपनीला नव्याने रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहे.
खाद्य प्रक्रियेकरीता दिग्गजांचे अर्ज
खाद्य प्रक्रिया मंत्रालयाकडे आजवर 60 अर्ज पीएलआय योजनेकरता दाखल झाले असून यामध्ये अमुल, आयटीसी, एचयुएल, ब्रिटानिया इंडस्ट्रीज, पार्ले ऍग्रो, टाटा कंझूमर प्रोडक्टस् यांचाही समावेश आहे. यावषी मार्चमध्ये भारत सरकारने खाद्य प्रक्रिया उद्योगाकरिता पीएलआय योजनेअंतर्गत 10 हजार 900 कोटी रुपयांची तरतूद अंतिम केली होती.