लवकरात लवकर डागडुजी करण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील रस्त्यांची अवस्था अक्षरशः बिकट झालेली पहायला मिळत आहे. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनधारकांचे हाल होत आहेत. अशीच परिस्थिती फोर्ट रोडवरील देशपांडे पेट्रोल पंपानजीक झालेली पहायला मिळत आहे. यामुळे वाहनधारकांना खड्डय़ांतूनच मार्ग काढण्याची वेळ आली आहे.
नेहमी रहदारीचे ठिकाण असलेल्या फोर्ट रोडची दयनीय अवस्था झाली आहे. येथील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांचे हाल होत आहेत. जवळच रविवार पेठ असल्यामुळे अवजड वाहनांची रांग या ठिकाणी लागलेली असते. ही अवजड वाहने येथील खड्डय़ात रुतून बसत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे.
येथील एम. के. स्टोअर्सच्या दुकानासमोरच जुनी गटार असून ती व्यवस्थित न बुजविल्याने या ठिकाणी अवजड वाहने रुतून बसत आहेत. येथील रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या खड्डय़ांची लवकरात लवकर डागडुजी करावी, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.