कॅसलरॉक ते कुलेम रेल्वेमार्गावर आतापासूनच खबरदारी
प्रतिनिधी / बेळगाव
नैर्त्रुत्य रेल्वेच्या विभागात घाट रस्त्यावर पावसाळय़ाच्या दिवसात दरड कोसळण्याची भीती असते. त्याचसोबत सखल भागांमध्ये पाणी साचून राहते. अशा ठिकाणी मान्सूनपूर्वी नैर्त्रुत्य रेल्वेने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. हुबळी विभागातील कॅसलरॉक ते कुलेम या दरम्यान दुरुस्ती करण्यात आली.
लोंढा ते वास्को रेल्वेमार्गावर अनेकवेळा दरड कोसळते. दोन वर्षांपूर्वी पावसाळय़ात दरड कोसळल्याने दोन दिवस रेल्वेमार्ग ठप्प होता. त्यामुळे या मार्गावर पावसाळय़ापूर्वीच दुरुस्ती करण्यात आली आहे. या ठिकाणी जोरदार पाऊस होत असतो. त्यामुळे रेल्वेचे नुकसान होत असल्याने आतापासूनच खबरदारी घेतली जात आहे. कॉंक्रिटचे बॉक्स, वाळू भरलेली पोती यांच्या वापर करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी पाणी भरते तेथे माती व खडी टाकून रेल्वेमार्गाची उंची वाढविण्यात आली आहे.