क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
आएसएल फुटबॉल स्पर्धेत काल वास्कोच्या टिळक मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात नॉर्थईस्ट युनायटेड एफसीने आपल्या तिसऱया विजयाची नोंद केली. नॉर्थईस्ट युनायटेडने सामन्यावर वर्चस्व ठेवताना जमशेदपूर एफसीला 2-1 गोलांनी पराभूत केले.
या सामन्यात मध्यंतरावेळी विजयी नॉर्थईस्ट युनायटेडचा संघ एक गोलने आघाडीवर होता. त्यांच्या आशुतोष मेहता व डिशॉर्न ब्राऊनने तर पराभूत जमशेदपूर एफसीचा एकमेव गोल पीटर हार्टलीने नोंदविला. या विजयाने नॉर्थईस्टला 3 गुण प्राप्त झाले. त्यांचे आता 12 सामन्यांतून तीन विजय, सहा बरोबरी व तीन पराभवाने 15 गुण झाले असून ते आता पाचव्या स्थानावर आहेत. पराभूत जमशेदपूर एफसीचे 12 सामन्यांतील तीन विजय, चार बरोबरी व पाच पराभवाने 13 गुण झाले असून ते आठव्या स्थानावर आहेत.
काल नॉर्थईस्टच्या बचावफळीने जमशेदपूरचा स्ट्रायकर नेरीजूस वाल्सकीसला चांगलेच जखडून ठेवल्याने त्याला मुक्तपणे खेळण्यास वाव मिळाला नाही. सामन्याच्या आठव्या मिनिटाला नेरीजूसचा गोल करण्याचा यत्न नॉर्थईस्टचा गोलरक्षक सुभाषिश रॉयने उधळून लावला. त्यानंतर नॉर्थईस्टच्या लुईस माशादोचा एकदा प्रयत्न दिशाहीन ठरला तर लगेच सुहैरने त्याला दिलेल्या पासवर त्याचा फटका जमशेदपूरचा गोलरक्षक टी. पी. रेहेनेशने झेपावत अडविला.
नॉर्थईस्ट युनायटडने आपल्या आघाडी घेणाऱया गोलाची नोंद 36 व्या मिनिटाला केली. यावेळी सामनावीराचा पुरस्कार मिळविलेल्या फॅडेरिको गॅल्लेगोच्या पासवर आशुतोष मेहताने प्रतिस्पर्धी गोलरक्षक रेहेनेशला भेदले व चेंडू जाळीत टोलविला. दुसऱया सत्रात जमशेदपूरने सहा बदल केले. प्रशिक्षकांनी अनिकेत जाधव, इद्रिसा सिल्ला, जॅकीचंद सिंग, अमरजीत सिंग, डेव्हीड ग्रँड आणि सुहैर यांना वगळून इसाक वानमालस्वामा, डिशॉर्न ब्राऊन, विलियम, मोहम्मद मोबाशीर, जॉन फित्झेराल्ड व मिती यांना संधी दिली.
मात्र जमशेदपूरचा या बदलाचा विशेष असा फायदा होऊ शकला नाही. सामन्याच्या 61 व्या मिनिटाला नॉर्थईस्टने आपली आघाडी आणखी एक गोलाने वाढविली. प्रतिस्पर्धी संघाच्या बचावफळीतील एका खेळाडूने केलेल्या चुकीचा फायदा घेत फॅडेरिको गॅल्लेगोने दिलेल्या पासवर डिशॉर्न ब्राऊनने गोलरक्षक रेहेनेशला लिलया भेदले व दुसरा गोल केला.
त्यानंतर जमशेदपूरच्या नेरीजूसचा फटका सुभाषिशने अडविल्यानंतर सामना संपण्यास एक मिनिट शिल्लक असताना जमशेदपूरच्या खास्सा कामाराने घेतलेल्या कॉर्नरवर पीटर हार्टलीने हेडरवर सुभाषिला भेदले व जमशेदपूरची पिछाडी एक गोलने कमी केली. शेवटच्या क्षणी टी. पी. रेहेनेशने गॅल्लेगोच्या पासवर लुईस माशादोचा फटका अडविल्याने नॉर्थईस्टची तिसरा गोल करण्याची संधी हुकली.