क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव
सातव्या हिरो इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धेत काल वास्कोतील टिळक मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात नॉर्थईस्ट युनायटेड एफसीने विजयाची नोंद करताना ईस्ट बंगालला 2-0 गोलांनी पराभूत केले. नॉर्थईस्टसाठी ईस्ट बंगालच्या चंदम याच्याकडून एक सॅल्फ गोलची नोंद झाली तर एक गोल छाराने
नोंदविला.
या विजयाने नॉर्थईस्टने आपल्या चौथ्या सामन्यात दुसऱया विजयाची नोंद केली. त्यांचे आता चार सामन्यांतून 8 गुण झाले आहेत. यंदा पहिल्यांदाच या स्पर्धेत खेळणाऱया ईस्ट बंगालचा हा सलग तिसरा पराभव ठरला. त्यांचा गुणफलक अजुनही कोराच आहे. विजयाने नॉर्थईस्ट युनायटेडचा संघ आता दुसऱया स्थानावर गेला असून ईस्ट बंगालचा संघ अजुनही तळाला म्हणजे अकराव्या स्थानावर आहे.
सामन्याच्या 9व्याच मिनिटाला नॉर्थईस्ट युनायटेडची गोल करण्याची संधी वाया गेली. क्वेसी अप्पीहने दिलेल्या पासवर निनाथोईंगनबा मितीने दिशाहीन फटका हाणला. सामन्यातील आपली पहिली धोकादायक चाल ईस्ट बंगालने 29व्या मिनिटाला केली. यावेळी नारायण दासने मैदानाच्या डाव्या बगलेतून रचलेल्या चालीवर जोरदार फटका हाणला, मात्र नॉर्थईस्टचा कप्तान बेंजामिन लँबोटने मोक्याच्या क्षणी येत चेंडू बाहेर लाथाडला.
सामन्याच्या 33व्या मिनिटाला नॉर्थईस्ट युनायटेडने गोल केला. उजव्या बगलेतून मिळालेल्या क्रॉसवर इद्रिस सिलाने मारलेला फटका बचावपटू एस. चंदमला लागला आणि ईस्ट बंगालचा गोलरक्षक देबजित मजुमदारला चकवित चेंडू जाळीत जाऊन विसावला. दुसऱया सत्रात नॉर्थईस्ट युनायटेडचे वर्चस्व आढळून आले.
सामन्याच्या 57व्या मिनिटाला नॉर्थईस्टला आघाडी वाढविण्याची संधी मिळाली होती. यावेळी निनाथोईंगनबा मितीने दिलेल्या पासवर क्वेसी अप्पीहचा गोल करण्याचा यत्न गोलक्षक देबजित मजुमदारने उधळून लावला. 61व्या मिनिटाला ईस्ट बंगालच्या अँथनी पिलकिंगटनने गोल बाद करण्याची संधी सदोष नेमबाजीने गमविली. सामन्याच्या शेवटच्या मिनिटाला नॉर्थईस्टने गोल केला आणि आपला विजय अधिक सोपा केला. सुहैर वाडाक्केपिडिकाने दिलेल्या पासवर छाराने गोलरक्षक देबजित मजुमदारला चकविले.