क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
सेंट पॉल्स स्कूल आयोजित सेंट पॉल्स संस्थेच्या 500 व्या वर्धापनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आंतर विभागीय शिक्षकांच्या व्हॉलीबॉल स्पर्धेत उद्घाटन दिवशी कॅम्प प्रकाश व नॉर्थ विभागीय संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
सेंट पॉल्स स्कूल मैदानावर आयोजित या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सेंट पॉल्सचे प्राचार्य फादर डॉ. सॅविओ ऍब्रु, फादर सेबॅस्टीन, क्रीडा शिक्षक ऍन्थनी डिसोजा, प्रमुख पंच बसवराज देवरमनी, संतोष शाहु, नीता तुक्कार आदी उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत एकूण सहा संघानी भाग घेतला आहे. पहिल्या सामन्यात नॉर्थ विभागाने कॅम्प ब संघाचा 25-19,25-12 तर दुसऱया सामन्यात शहापूर विभाग संघाने कॅम्प क संघाचा 25-9, 25-21 असा पराभव केला. तिसऱया सामन्यात कॅम्प विभाग अ संघाने टिळकवाडी विभाग संघावर 25-17, 20-25 15-13 अशी मात करुन पुढील फेरी गाठली. उपांत्य सामन्यात नॉर्थ संघाने शहापूर संघाचा 25-23, 14-25, 15-07 तर दुसऱया उपांत्य सामन्यात प्रकाश कॅम्प संघाने इंद्रजित कॅम्प संघाचा 26-24,15-25, 15-10 असा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामना गुरुवार दि. 9 रोजी खेळविण्यात येणार आहे. बुधवारी महिला शिक्षकांचे थ्रोबॉल सामने खेळविण्यात येणार आहेत. ही स्पर्धा चार विभागातील संघांत होणार आहे.