मगो नेते सुदिन ढवळीकर यांची मागणी
प्रतिनिधी /शिरोडा
काँग्रेसच्या कार्यकाळात केंद्रात झालेला बोफोर्स तोफा खरेदी घोटाळा केवळ रु. 7 कोटींचा होता. त्यावेळी विरोधात असलेल्या भाजपाने मोठा हंगामा करीत त्याची सीबीआय चौकशी मागितली होती. गोव्यातील बांधकाम खात्यात नोकरभरतीमध्ये झालेला आर्थिक गैरव्यवहार रु. 70 कोटींचा असल्याचा दावा खुद्द भाजपाचेच आमदार बाबुश मान्सेरात यांनी केला आहे. या महाघोटाळय़ाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी मगो नेते आमदार सुदिन ढवळीकर यांनी केली आहे.
शिरोडा येथे रविवारी झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना त्यांनी ही मागणी केली. भाजपा सरकारमध्ये लैगिंक अत्याचार करणारे, पैसे घेऊन नोकऱया विकणारे व मंत्रीमंडळात शिवीगाळ करणारेही मंत्री आहेत. त्यांना जाब न विचारता मुख्यमंत्री डोळय़ावर पट्टी बांधून गप्प बसले आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
शिरोडा मतदारसंघ हा पूर्वीपासून मगो पक्षाचा बालेकिल्ला आहे. मागील पोटनिवडणुकीत मगोचे उमेदवार दीपक ढवळीकर हे निवडणूक जिंकले होते. मात्र भाजपाने सरकारी कर्मचाऱयांना धमक्या व आमिषे दाखवून गैरमार्गाने ही निवडणूक जिंकल्याचा दावाही ढवळीकर यांनी केला.
लवकरच बुथनिहाय समित्यांची स्थापना
शिरोडय़ाची जागा यंदा मगो पक्षच जिंकणार असून व्ही फॉर शिरोडा सारख्या स्थानिक संघटनांनी मगो सोबत येण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. शिरोडा मतदारसंघात बुथनिहाय समिती लवकरच स्थापन करुन प्रचारकार्याला सुरुवात होणार आहे. आपण स्वतः या मतदारसंघात लक्ष घालणार असल्याचे सुदिन ढवळीकर यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ कार्यकर्ते गजानन तिळू नाईक, युवा कार्यकर्ते संकेत मुळे, केंद्रीय समितीचे पदाधिकारी अनंत नाईक, राजू नाईक, नरेश गावडे, बोरीचे माजी सरपंच सतीश नाईक, माजी पंचसदस्य मानुएल क्रूझ, योगानंद बोरकर आदी उपस्थित होते.
दिलेली जबाबदारी स्वीकारणार : मुळे
शिरोडा मतदारसंघात मगो पक्षाचे कार्य सातत्याने सुरु आहे. कोरोना काळात काही तांत्रिक कारणामुळे त्यांत किंचित खंड पडला होता. आजही येथील जनतेचा या पक्षावर पूर्ण विश्वास असल्याचे संकेत मुळे म्हणाले. आपण पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता असून पक्षाकडून दिली जाणारी जबाबदारी आपण स्वीकारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भाऊसाहेबांचा वारसा पुढे न्या : नाईक
गजानन नाईक म्हणाले, मगो पक्षाची स्थापना गोरगरीबांच्या उद्धारासाठी झाली होती. मुक्तीनंतर शिक्षण, कुळ मुंडकार कायदा व पायाभूत साधनसुविधा उभारण्यामागे भाऊसाहेब बांदोडकरांची दूरदृष्टी होती. त्यांचा हा वारसा पुढे नेण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने तळागाळात कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
सतीश नाईक, योगानंद बोरकर, प्रशिला गावकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. मगो पक्षाचा झेंडा शिरोडा मतदारसंघावर पुन्हा रोवण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.