प्रतिनिधी/ सातारा
नौदल, आर्मी, बँक अशा ठिकाणी नोकरी लावण्याचे अमिष दाखून सातारा जिल्हय़ातील हजारो युवकांना कोटय़वधी रुपयांचा गंडा घालणारी टोळी जेरबंद करण्यात सातारा पोलिसांना यश मिळाले आहे. सहाय्यक पोलीस अधिक्षक समीर शेख व त्यांच्या सातारा उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या टीमने याप्रकरणी चारजणांना अटक केली असून यामुळे मोठे रॅकेट समोर आले आहे.
यासंदर्भात सहाय्यक पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी पत्रकार परिषद घेवून त्यात ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, दिवसेंदिवस बेरोजगार युवकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अनेक तरुण तरुणी नोकरी मिळण्याच्या अमिषाला बळी पडताना दिसत आहेत. या युवकांना गंडा घालणाऱया सचिन केपन्ना तरफदार (वय 34 मूळ रा. मुतनाळ, ता. गडहिंग्लज, सध्या रा. पनवेल, नवी मुंबई), अमोल गोपीचंद मदनकर (वय 45 रा. नागपूर), रश्मी अमोल मदनकर (रा. नागपूर), भाऊसो शिवाजी शिंदे (वय 28 रा. धोंडेवाडी, ता. खटाव) व निलेश नामदेव कोकणे (वय 38 रा. दहिवडी, ता. माण) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून यापैकी फरारी आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सन 2017 ते 2018 मध्ये सातारा जिल्हय़ातील सातारा, कोरेगांव, माण, जावली, कराड, पाटण या तालुक्यातील 19 ते 25 वयोगटातील बेरोजगार तरुण व तरुणींना नौदल, आर्मी, ओएनजीसी, आयसीआयसीआय बँक अशा ब वर्ग, सी वर्गातील शासकीय पदावर नोकरी लावण्याचे अमिष या टोळीने दाखवले. त्या युवकांना मुंबई, कलकत्ता येथे नेले. तिथे या युवकांना बनावट नियुक्तीपत्रे देवून त्यांच्याकडून प्रत्येकी तीन ते पाच लाखापर्यंत रक्कम स्वीकारुन सुमारे एक कोटी रुपयाची फसवणूक या टोळीने केली आहे.
याबाबत बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून सदर गुन्हय़ात काही आरोपींना अटक करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. परंतु गुन्हय़ातील आरोपी हे परांगदा झालेले होते. जिल्हय़ातील अनेक तरुण तरुणींची मोठय़ा स्वरुपात रोख रक्कम स्वीकारुन फसवणूक केली असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार सहाय्यक पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. यातील आरोपींचे ठावठिकाणा व त्यांच्याबाबत महत्वाचे धागेदोरे हाती मिळताच समीर शेख व उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा कार्यालयाकडील उपनिरीक्षक राजेंद्र यादव, हवालदार राकेश देवकर, पोलीस नाईक संतोष देशमुख, बोरगाव पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल चेतन बगाडे, ढोणे, नदाफ यांनी आरोपीचा पनवेल तसेच दहिवडी येथे शोध घेत त्यांना शिताफीने ताब्यात घेतले.
फसवणूक झालेल्यांनी संपर्क साधावा
या गुन्हय़ात चार आरोपी अटक करण्यात आले असून जिल्हय़ातील अनेकांची फसवणूक झालेली आहे. या गुन्हय़ाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस अधिक्षक समीर शेख करत असून जिल्हय़ात ज्या ज्या युवकांची अशा प्रकारे नोकरीसाठी फसवणूक झाली आहे त्यांनी त्यासाठी आवश्यक कागदपत्रे घेवून सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाशी फोन – 02162-234886 यावर संपर्क साधावा, असे आवाहन समीर शेख यांनी यावेळी केले आहे.