आपोआप ट्रान्सफर होणार पीएफ खाते – सेंट्रलाइज आयटी सिस्टीमला मंजुरी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
खासगी कंपन्यांमध्ये नोकरी करणाऱया कर्मचाऱयांसाठी दिलासा देणारे वृत्त आहे. या कर्मचाऱयांना आता नोकरी बदलल्यावर पीएफ ट्रान्सफर करविण्याच्या त्रासापासून मुक्ती मिळणार आहे. ईपीएफओच्या शनिवारी झालेल्या बोर्ड बैठकीत यावर निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे कोटय़वधी कर्मचाऱयांना मोठा दिलासा मिळणार आहे.
बोर्डाने शनिवारच्या बैठकीत पीएफ खात्यांच्या सेंट्रलाईज आयटी सिस्टीमलाही मंजुरी दिली आहे. सेंट्रलाईज सिस्टीम खातेधारकांच्या विविध खात्यांना विलीन करत एक खाते तयार करणार आहे. केंद्रीय कामगारमंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखालील ईपीएफओच्या 229 व्या बोर्ड बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
बोर्डाने याचबरोबर एफआयएसी समितीला केस टू केस बेसिसवर गुंतवणूक करण्याचेही अधिकार दिले आहेत. याचबरोबर भारत सरकारकडून अधिसूचित सर्व एसेट क्लासमध्ये आता ईपीएफओ गुंतवणूक करू शकणार आहे. ईपीएफओला पेपरलेस संस्थेचा दर्जा देण्याचाही सरकारचा प्रयत्न आहे.
नोकरी बदलल्यावर संबंधिताचे पीएफ खाते आता आपोआप नव्या खात्यात ट्रान्सफर किंवा विलीन होणार आहे. आतापर्यंत अकौंट ट्रान्सफर करविण्याचे काम स्वतःच करावे लागत होते. याकरता जुन्या आणि नव्या कंपनीत काही कागदोपत्री औपचारिकता पूर्ण कराव्या लागत होत्या. या कागदोपत्री प्रक्रियेमुळे अनेक जण जुन्या कंपनीतील पीएफ रकमेवर दावा करत नव्हते.
शनिवारच्या बैठकीत इम्पलॉयी पेन्शन स्कीम (ईपीएस) अंतर्गत मिळणारी किमान पेन्शन आणि पीएफवर मिळणाऱया व्याजावर निर्णय होईल अशी अपेक्षा व्यक्त होत होती. पण या बैठकीत यासंबंधी कुठलाच निर्णय घेण्यात आलेला नाही. सध्या पीएफवर 8.5 टक्के वार्षिक व्याज देण्यात येत आहे.
ईपीएफओच्या बोर्ड बैठकीत कर्मचाऱयांच्या एकूण वार्षिक जमा रकमेपैकी 5 टक्क्यांपर्यंतची रक्कम पायाभूत सुविधा गुंतवणूक ट्रस्टसह पर्यायी गुंतवणुकींमध्ये गुंतविण्याची मंजुरी देण्यात आली आहे. कर्मचाऱयांना अधिक व्याज देण्याकरता सरकार या रकमेवर अधिक परतावा इच्छित आहे.