घटप्रभा पोलिसांची कारवाई, दोन कार, दोन मोटार सायकली जप्त
प्रतिनिधी/ बेळगाव
1 लाखाच्या चलनी नोटांच्या बदल्यात तीन लाख रुपये देण्याचे सांगून फसवणूक करणाऱया टोळीतील चौघा जणांना घटप्रभा पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे. त्यांच्या जवळून 2 कार, 2 मोटारसायकली व 1 लाख 80 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी ही माहिती दिली आहे.
रफिक उर्फ महम्मदइसाक अब्दुलरेहमान देसाई& (वय 55, मुळचा रा. गोकाक, सध्या रा. धुपदाळ), गुंडू सदाशिव बिरादार-पाटील (वय 35, रा. सिध्दापूर, ता. रायबाग), मुनाफ रफीक उर्फ महम्मदइसाक देसाई (वय 21, मुळचा रा. गोकाक, सध्या रा. धुपदाळ), मल्लिकार्जुन सिद्धाप्पा कणमडी (वय 32, रा. गोकाक) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
त्यांच्या जवळून केए 22 सी 0351 क्रमांकाची इनोव्हा, एमएच 08 सी 4201 क्रमांकाची इंडाका कार व दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी सकाळी या टोळीने धुपदाळ येथील हणमंत गाडीवड्डर यांच्या घरी भाडय़ाने राहणाऱया रफीक देसाई यांच्या घरात नोटांची बंडले तयार करीत असल्याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक एच. वाय. बालदंडी व त्यांच्या सहकाऱयांनी अचानक छापा टाकून त्यांना अटक केली आहे.
नोटांच्या बंडलांवर दोन्ही बाजूला 500 चलनी नोटा घालून बंडले तयार करण्यात आली होती. 1 लाख चलनी नोटांच्या बदल्यात 3 लाख बनावट नोटा देण्याचे सांगून फसवणूक करण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी या टोळीच्या मुसक्मया आवळल्या आहेत. त्यांच्यावर भा.दं.वि. 420, 511 कलमान्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.