आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर यांची माहिती : स्पुटनिकचे राज्यातच उत्पादन शक्य
प्रतिनिधी / बेंगळूर
आतापर्यंत राज्याला कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे एकूण 1,22,20,510 डोस प्राप्त झाले आहेत. यापैकी 1,13,61,234 जणांना ही लस देण्यात आली आहे. राज्यातील सर्व नागरिकांना नोव्हेंबरपूर्वी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस देण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने बाळगले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली. बेंगळुरात ते पत्रकारांशी बोलत होते.
मंत्री सुधाकर पुढे म्हणाले, केंद्र सरकारने राज्याला कोरोना प्रतिबंधक लसीचे 1,11,26,340 डोस दिले आहेत. दरम्यान, राज्य सरकारने पुण्याच्या सीरम इन्स्टिटय़ूटला कोव्हिशिल्डचे 2 कोटी डोस परवठा देण्याचा आदेश दिला आहे. त्यापैकी 2 लाख डोस अलिकडेच उपलब्ध झाले आहेत. यातून 45 वर्षांवरील नागरिकांना लसीचा दुसरा डोस दिला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
विदेशातून लसींची आयात करण्यात येणार आहे. भारत बायोटेक संस्था कोव्हॅक्सिन लसींचे उत्पादन करीत आहे. तसेच स्पुटनिक लस राज्यातच उत्पादन करणे शक्य आहे. केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी लसीचे 1,050 वायल्स पाठविले आहेत. आणखी 500 वायल्स तातडीने पाठवून द्यावेत अशी विनंती केंद्रीयमंत्री डी. व्ही. सदानंदगौडा यांच्याकडे केली आहे. पुढील आठवडय़ात मोठय़ा प्रमाणात लस पुरवठा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. मुलांना लस देण्याबाबत मार्गसूची जारी केलेली नाही. याबाबत अध्ययन सुरू आहे, असेही सुधाकर म्हणाले.
लवकरात लवकर लस देण्याची गरज
राज्यात मंगळवारी एकाच दिवशी 58,395 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानुसार आतापर्यंत एकूण 16,74,487 जणांनी कोरोनावर मात केली आहे. हे दिलासादायक वृत्त आहे. राज्यातील मृतांची संख्या कमी करणे, वेळेत संसर्ग झालेल्या रुग्णांची ओळख पटविणे आणि त्यांच्यावर उपचार करण्याचे आव्हान आमच्यासमोर आहे. तसेच सर्वांना लवकरात लवकर लस देण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.
बुधवारी कोव्हिशिल्डचे 2 लाख डोस उपलब्ध…
राज्य सरकारने थेट लस उत्पादक कंपन्यांकडून कोरोना प्रतिबंधक लस खरेदीचा निर्णय घेतला असून यापूर्वी ऑर्डर दिलेल्या कोव्हिशिल्डच्या लसीपैकी आणखी 2 लाख डोस बुधवारी उपलब्ध झाले आहेत. राज्यातील 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना मोफत लस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्याकरिता कोव्हिशिल्डचे 2 कोटी डोस आणि कोव्हॅक्सिनचे 1 कोटी डोस खरेदीची ऑर्डर लस उत्पादक कंपन्यांना देण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी ट्विटरवर दिली आहे.