केंद्र सरकारला मोठा दिलासा : आर्थिक घडामोडी गतिमान झाल्याचा संकेत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना महामारीच्या काळात टप्पाबद्ध पद्धतीने सुरू करण्यात आलेल्या आर्थिक हालचाली आता पूर्णपणे खुल्या झाल्या आहेत. आर्थिक आणि औद्योगिक हालचालींमध्ये वेग आल्याने सरकारला मिळणारा जीएसटी महसूलही कोरोनापूर्व काळापेक्षाही अधिकच्या पातळीवर पोहोचला आहे. नोव्हेंबर महिन्यातही जीएसटी संकलन 1 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक झाले आहे.
केंद्र सरकारकडून प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार नेव्हेंबरमध्ये 1,04,963 कोटी रुपयांचा जीएसटी प्राप्त झाला आहे. यात सीजीएसटी 19,189 कोटी रुपये, एसजीएसटी 25,540 कोटी रुपये आणि आयजीएसटी 51,992 कोटी रुपयांचा राहिला आहे.
51,992 कोटी रुपयांच्या आयजीएसटीमध्ये 22,078 कोटी रुपये आयात सामग्रीद्वारे प्राप्त झाले आहेत. तर केंद्र सरकारने 8,242 कोटी रुपये अधिभारातून प्राप्त केले आहेत. यातील 809 कोटी रुपये आयात सामग्रीवरील अधिभारातून मिळाले आहेत.
नोव्हेंबर 2019 च्या तुलनेत 1.4 टक्के अधिक प्रमाणात जीएसटीचे संकलन करण्यात आले आहे. मंदीसदृश काळाला तोंड देणाऱया अर्थव्यवस्थेसाठी जीएसटीचे संकलन वाढणे अत्यंत आश्वासक आहे. आयजीएसटीमधून 16,286 कोटी रुपये राज्य जीएसटीशी जोडण्यात आले आहेत. या ‘सेटलमेंट’नंतर सीजीएसटी 41,482 कोटी रुपये आणि एसजीएसटी 41,826 कोटी रुपयांचा राहिला आहे. या आकडेवारीदरम्यान आणखी एक चांगला संकेत दिसून आला आहे. आयात सामग्रीतूनही 4.9 टक्के अधिक प्रमाणात जीएसटी प्राप्त झाला आहे. तर 30 नोव्हेंबरपर्यंत 80 लाख जीएसटीआर-3बी विवरणपत्रे सादर करण्यात आली आहेत.