प्रतिनिधी / सातारा :
कॉम्रेड्स सोशल ऑर्गनायझेशनच्या नेतृत्वाखाली जिल्हाभरातील शेकडो युवक, युवतींनी सैन्य भरती, पोलीस भरती घेण्यासाठी आक्रमक भूमिका घेत ठिय्या आंदोलन सुरु केले. दुपारी आंदोलनस्थळी उदयनराजे भोसले यांनी भेट दिली व आंदोलकांचे म्हणणे ऐकल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनाशी याबाबत चर्चा केली. तेव्हा नोव्हेंबरमध्ये भरती प्रक्रिया सुरु होईल, असा संकेत प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
याबाबत आंदोलकांशी बोलताना खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, तुम्ही दोन वर्षे का गप्प बसला? मला का भेटला नाही. त्यावेळीच याबाबत प्रशासनाकडे मागणी केली असती तर कोरोनाबाबतचे नियम पाळून भरती प्रक्रिया राबवण्याबाबत प्रशासनाने सदर्न कमांडर यांना कळवले असते. आता दोन वर्षे वाया गेल्याने सैन्य भरती, पोलीस भरती बरोबरच इतर शासकीय विभागांच्या भरतीमध्ये देखील युवक, युवतींना वयाची अडचण येणारच आहे. त्यामुळे ही अडचण काही फक्त तुमची नसून सर्वांचीच आहे. त्यावर शासनाकडून तोडगा काढण्याची गरज आहे. आता प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर त्याबाबतही बोलणे झाले असून प्रशासनाकडून सैन्य भरती नोव्हेंबरमध्ये होईल असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता युवकांनी वेळ न वाया घालवता प्रत्येक दिवस महत्वाचा समजून पुन्हा मेहनत घ्यावी व सैन्य भरतीमध्ये उतरावे.