ब्राझीलमध्ये दुर्घटना : 7 जणांचा मृत्यू : 20 बेपत्ता
वृत्तसंस्था / ब्राझिलिया
ब्राझीलच्या मिनस गेरॅस प्रांतात शनिवारी एका सरोवरात नौकेवर दरड कोसळल्याने 7 जणांचा मृत्यू ओढवला तर 32 जण जखमी झाले आहेत. याचबरोबर 20 जण बेपत्ता झाले आहेत. या दुर्घटनेची चित्रफित देखील समोर आली आहे. फर्नास लेकवर नौकाविहाराचा आनंद घेणाऱया लोकांवर उभ्या पर्वताचा एक मोठा हिस्सा तुटून पडत असल्याचे यात दिसून येते.
मिनस गेरॅस फायरफायटर्सचे कमांडर कर्नल एडगार्ड एस्टेवो डी सिल्वा यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. त्यांच्यानुसार आतापर्यंत 7 जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. तर 32 जण जखमी झाले आहेत. 20 जण बेपत्ता झाल्याचा अनुमान आहे. फर्नास सरोवराला ‘मिनासचे समुद्र’ म्हटले जाते. साओ पावलोपासून 420 किलोमीटर अंतरावरील हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे.
3 नौकांवर कोसळली दरड
ही दुर्घटना साओ जोस डा बारा आणि कॅपिटलियो भागांदरम्यान घडली आहे. कॅपिटलियो भागाच्या फर्नास सरोवरात पर्वताचा एक मोठा हिस्सा तुटून कोसळला. या दुर्घटनेच्या तावडीत पर्यटकांच्या 3 नौका सापडल्या आहेत.
अतिवृष्टीमुळे दुर्घटना
मिनस गेरॅसच्या गव्हर्नर रोमू जेमा यांच्यानुसार अतिवृष्टीमुळे कॅपिटलियोमध्ये फर्नास सरोवरात पर्वताचा हिस्सा कोसळला आहे. आम्ही लोकांना आवश्यक सुरक्षा आणि सहाय्य करण्याचे काम सुरूच ठेवणार आहोत. बेपत्ता लोकांचा शोध सुरूच राहणार असला तरीही पाणबुडे स्वतःच्या सुरक्षेसाठी रात्री हे काम थांबवतील असे जेमा यांनी सांगितले आहे. मिनस गेरॅस प्रांतात अतिवृष्टी होत असल्याने पूर आला आहे. या संकटामुळे सुमारे 17 हजार लोकांना बेघर व्हावे लागले आहे. नौदलाने शोध तसेच बचावकार्यासाठी एक पथक तैनात केल्याची माहिती ब्राझीलचे अध्यक्ष बोल्सोनारो यांनी दिली आहे.