विशाखापट्टणममध्ये 12 व्या प्रेसिडेंट फ्लीट रिह्यूचे आयोजन: 60 युद्धनौका, पाणुबडय़ा अन् 55 विमानांनी घेतला भाग
@ वृत्तसंस्था / विशाखापट्टणम
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणममध्ये 12 व्या प्रेसिडेंट फ्लीट रिव्हय़ूमध्ये भाग घेतला आहे. राष्ट्रपती कोविंद यांच्यासह तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते. यादरम्यान राष्ट्रपतींना 12 व्या प्रेसिडेंट फ्लीट रिह्यू कार्यक्रमात गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.
राष्ट्रपती कोविंद यांनी नौदलाच्या स्वदेशनिर्मिती गस्तनौका आयएनएस सुमित्रावरून सामर्थ्याची प्रचिती घेतली आहे. त्यानंतर ईस्टर्न नेव्हल कमांडने राष्ट्रपती फ्लीट रिव्हय़ूच्या 12 व्या आवृत्तीदरम्यान 12 तोफांची सलामी दिली. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह देखील उपस्थित होते.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 60 हून अधिक युद्धनौका आणि पाणबुडय़ांसह 55 विमानांच्या भारतीय नौदलाच्या ताफ्याची समीक्षा केली. आयएनएस तरंगिनी, आयएनएस ज्योति, आयएनएस सुदर्शनी, आयएनएलसीयू 51, आयएनएस कुलिश, सागर अन्वेशिका, आयएनएस जमुना, आयसीजीएस वरद, आयसीजीएस शौनक, आयएनएस सुतलेज, आयएनएस सर्वेक्षक, आयएनएस कमरोटा यांनी यात भाग घेतला आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त पूर्ण देशात ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा केला जात असल्याने 12 व्या प्रेसिडेंट फ्लीट रिव्हय़ूचे विशेष महत्त्व आहे.
फ्लीट रिव्हय़ूनंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि दूरसंचार राज्यमंत्री देवुसिंह जे. चौहान यांच्या उपस्थितीत राष्ट्रपतींकडून एक विशेष फर्स्ट डे कव्हर आणि एक स्मारक टपाल तिकीट जारी करण्यात आले. युद्धनौकांना विविध नौसैनिक ध्वजांसह औपचारिक स्वरुपात तयार करण्यात आले असून 19 आणि 20 फेब्रुवारी रोजी सूर्यास्तापासून मध्यरात्रीपर्यंत त्यांना उजळविण्यात येणार आहे. हे दृश्य विशाखापट्टणमचे रहिवासी समुद्र किनाऱयापासून पाहू शकणार आहेत. विशाखापट्टणमध्ये पीएफआरचे दुसऱयांदा आयोजन झाले आहे. 2006 साली तत्कालीन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी विशाखापट्टणममध्ये नौदलाच्या ताफ्याची समीक्षा केली होती.