डिसेंबरमध्ये भारत अन् अमेरिकेतील करारावर शिक्कामोर्तब
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत आणि अमेरिका यांच्यात डिसेंबर महिन्यात 2प्लस2 चर्चा होणार आहे. या बैठकीदरम्यान 300 कोटी रुपयांचा करार होण्याची शक्यता आहे. भारतीय नौदल शस्त्रास्त्रांनी युक्त प्रिडेटर ड्रोन्सच्या खरेदीसाठी संरक्षण अधिग्रहण परिषदेकडे धाव घेणार आहे. तर 2प्लस 2 बैठकीत अफगाणिस्तानत आणि हिंद-प्रशांत सागर क्षेत्रातील चीनच्या वाढत्या आक्रमकतेवर प्रामुख्याने चर्चा होणार आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि विदेशमंत्री एस. जयशंकर हे अमेरिकेचे विदेशमंत्री एंटनी ब्लिंकेन आणि संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांना भेटणार आहेत. ही भेट वॉशिंग्टनमध्ये होणार असून त्याची तारीख लवकरच निश्चित होणार आहे.
चीन आणि अफगाणिस्तानवर चर्चेसोबतच दोन्ही देश ड्रोन व्यवहाराचीही घोषणा करू शकतात. भारतीय नौदल 30 एमक्यू 9ए प्रिडेटर ड्रोन्सच्या खरेदीसाठी एक्सेप्टेंस ऑफ नॅसेसिटीसाठी (एओएन) संरक्षण अधिग्रहण परिषदेकडे प्रस्ताव मांडणार आहे. नौदलच ही पूर्ण प्रक्रिया हाताळत आहे. या करारानंतर तिन्ही संरक्षण दलांना प्रत्येकी 10 ड्रोन्स मिळतील.
संरक्षण अधिग्रहण परिषदेच्या मंजुरीनंतर मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीच ाr सहमती मिळवावी लागणार आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यास बैठकीत घोषणा केली जाऊ शकते. अन्यथा त्यानंतर याची घोषणा करण्यात येणार आहे. अमेरिकेने पूर्ण प्रकल्पाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. अलिकडेच अमेरिकेचा दौरा केलेले पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही जनरल ऍटोमिक्सच्या सीईओंची भेट घेतली होती.