प्रतिनिधी /म्हापसा
राज्यभर गाजलेल्या हणजूण येथील कर्लीज बार ऍण्ड रेस्टॉरंटचे बांधकाम तब्बल 15 दिवसाच्या अवधीनंतर जवळ जवळ पूर्णतः जमिनदोस्त करण्यात प्रशासनाला यश आले आहे. भाजपच्या अभिनेत्या सोनाली फोगट यांचा या हॉटेलात अमली पदार्थ सेवन केल्यावर मृत्यू झाल्याने हे रेस्टॉरंट देशभर प्रसिद्धीच्या झोतात आले होते. या रेस्टॉरंटचे मालक एडवीन नुनीस याला योथे ड्रग्स पॅडलर्स म्हणून अटक केल्यावर या भागातील ड्रग्स पॅडलर्सचे धाबे दणाणले होते. सध्या नुनीस यांना हैदराबाद पोलिसांनी पुढील चौकशीसाठी आपल्या ताब्यात घेतले आहे. दरम्यान पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कर्लीज जमिनदोस्त केले असले तरी या मालकांनी किनारी भागात अशाच प्रकारे बार ऍण्ड रेस्टॉरंट उभारण्यासाठी प्रयत्न चालविले असून त्याने मंजुरीही मिळविली असल्याची माहिती देण्यात आली. आपले राजकीय वजन वापरून अन्य एक रेस्टॉरंट ताब्यात घेतल्याची माहिती हाती आली आहे.
भरती रेषेपासून अवघ्या काही अंतरावरच हे रेस्टॉरंट असल्याने ते मोडीस काढावे अशी याचिका आरटीआय कार्यकर्ते काशिनाथ शेटय़े यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती त्यास रेस्टॉरंटचे मालक एडवीन नुनीस यांनी आव्हान देत हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोचले होते मात्र सागरी प्राधिकरणाने हे कर्लीज रेस्टॉरंट समुद्र रेषेच्या आत असल्याने जमिनदोस्त करण्याची मागणी केल्यावर या रेस्टॉरंटवर कायदेशीर कारवाई करण्यात आली होती. जवळ जवळ संपूर्ण भाग जमिनदोस्त करण्यात आला असून काही थोडा भाग मोडण्याचा बाकी आहे.
आपल्या रेस्टॉरंटवरील हतोडा थांबविण्यासाठी मालक नुनीस यांनी बरेच प्रयत्न केले मात्र त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. उलट तेच ड्रग्स प्रकरणात पॅडलर म्हणून सापडल्याने तेही काही करू शकले नाही.