ऑनलाईन टीम / पुणे :
कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, म्हणून लॉकडाउनमुळे बंद असलेले न्यायालयीन कामकाज 8 जूनपासून दोन शिफ्टमध्ये सुरू होणार आहे. न्यायालयात होणारी गर्दी कमी राहावी म्हणून 50 टक्के न्यायिक अधिकारी, न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामकाज सुरू होणार आहे. मुंबई हायकोर्टाने याबाबत राज्यातील सर्व न्यायालयांना सूचना दिल्या आहेत.
लॉकडाउनमुळे 23 मार्चपासून न्यायालयीन कामकाज बंद होते. फक्त तातडीच्या दाव्यांवर न्यायालयात सुनावणी सुरू होती. आठ जूनपासून दोन शिफ्टमध्ये कोर्टाचे कामकाज सुरू होणार होणार आहे. सकाळी 10 ते 1 आणि दुपारी 2.30 ते 5.30 यावेळेत कोर्टाचे कामकाज चालणार आहे. 50 टक्के न्यायिक अधिकारी आणि न्यायालयीन कर्मचारी यांच्या उपस्थितीत कोर्टाचे कामकाज सुरू होणार आहे. प्रमुख न्यायाधीश न्यायालयीन कामाच्या वेळा बदलू शकतात. मात्र, शिफ्टच्या वेळा बदलू शकत नाहीत.
न्यायाधीशांनी कोर्टातील कामकाज करताना 15 पेक्षा जास्त मँटर बोर्डवर घेऊ नये. पक्षकारांच्या अनुपस्थितीत आदेश देऊ नये. एक्सपार्टी ऑर्डर, साक्षीदारांना समन्स बजावताना सध्याची परिस्थिती लक्षात घ्यावी. निकालाच्या सुनावणीच्या टप्प्यात असलेले निकाल आधी देण्यास न्यायाधीश प्राधान्य देऊ शकतात. डेली बोर्डची कॉपी एक दिवस आधी बार असोसिएशनला द्यावी. त्यामुळे कोर्टात होणारी गर्दी कमी होईल. कोर्ट हॉलमध्ये विनाकारण गर्दी होऊ नये, यासाठी ज्या केसची सुनावणी आहे, त्यातील वकील आणि पक्षकारांना हॉलमध्ये प्रवेश करु द्यावी. इतरांनी विनाकारण गर्दी करू नये.