ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
न्यायालयाच्या अवमान प्रकरणी ज्येष्ठ विधिज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भूषण यांना सर्वोच्च न्यायालयाने एक रुपया दंडाची शिक्षा ठोठावली. 15 सप्टेंबरपर्यंत दंडाची ही रक्कम न भरल्यास भूषण यांना तीन महिने तुरूंगवास आणि तीन वर्षे वकिली करण्यावर बंदी घालण्यात येईल, असेही न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती अरूण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील न्यायपीठाने भूषण यांना ही शिक्षा सुनावली.
जून 2019 मध्ये प्रशांत भूषण यांनी ट्विट करून सरन्यायाधीश शरद बोबडे व सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. यापूर्वीही त्यांनी चार माजी मुख्य न्यायमूर्तींवर टीका केली होती. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने प्रशांत भूषण यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते.
मागील सुनावणीच्या वेळी प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला होता. प्रशांत भूषण यांना शिक्षा देऊ नये, अशी विनंती अटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांनी मागील सुनावणीत न्यायालयाला केली होती.