20 ऑगस्टला शिक्षेची सुनावणी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांना सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवले आहे. 20 ऑगस्ट रोजी त्यांना शिक्षा सुनावली जाणार आहे. न्यायमूर्ती अरुण मिश्रा, भूषण गवई आणि कृष्ण मुरारी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी शुक्रवारी पार पडली.
सरन्यायाधीश शरद बोबडे हे नागपूरमधील राजभवनात मोटारसायकलवर स्वार झाल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. त्यावर प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करणारे ट्विट केले होते. हा न्यायालयाचा अवमान असून भूषण यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी वकील महेश्वरी यांनी केली होती. त्याची दखल घेत 22 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस बजावली होती. प्रशांत भूषण यांनी नोटीसीला उत्तर देताना मत अभिव्यक्तीमुळे न्यायालयाचा अवमान होऊ शकत नाही असे उत्तर दिले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले असून आता न्यायालय त्यांना कोणती शिक्षा सुनावते याकडे कायदा क्षेत्राचे लक्ष लागले आहे.