वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संयुक्त अरब अमिरात व श्रीलंकेनंतर आता न्यूझीलंडने देखील आयपीएल स्पर्धा भरवण्याचा प्रस्ताव भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे सादर केला. कोव्हिड-19 च्या संकटामुळे भारतात आयपीएल स्पर्धा भरवणे शक्य नसेल तर ही स्पर्धा आमच्या देशात घेण्याची आमची तयारी आहे, असे क्रिकेट न्यूझीलंडने नमूद केले. ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्वचषक स्पर्धा लांबणीवर टाकली गेली किंवा रद्द केली गेली तर त्या कालावधीत यंदाची आयपीएल स्पर्धा भरवण्याचा बीसीसीआयचा विचार असून यासाठी ते विविध पर्याय आजमावून पाहत आहेत.
यंदाची आयपीएल स्पर्धा भारतातच भरवण्यासाठी बीसीसीआयचे प्रथम प्राधान्य असेल. पण, देशभरात कोरोनाचे संकट सातत्याने चिंतेत भर घालत असल्याने तूर्तास, ती शक्यता मावळत चालल्याचे चित्र आहे. ब्राझील व अमेरिकेनंतर भारतातच सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले, यावरुनही यातील भीषणता दिसून येते. त्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने अन्य पर्यायांचा विचार करण्यास यापूर्वीच सुरुवात केली आहे.
‘भारतातच आयपीएल भरवण्यासाठी आमचे सर्वोच्च प्राधान्य असेल. पण, सध्याची स्थिती पोषक नाही. अशा परिस्थितीत आम्ही विदेशातील पर्यायांचा विचार करु. संयुक्त अरब अमिरात व श्रीलंकेनंतर आता न्यूझीलंडने देखील आयपीएल स्पर्धा आपल्या देशात भरवण्याची तयारी दर्शवली आहे’, असे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने गोपनियतेच्या अटीवर नमूद केले.
यापूर्वी दोनवेळा विविध कारणांमुळे आयपीएल स्पर्धा विदेशात भरवली गेली. 2009 मध्ये लोकसभा निवडणुकीमुळे पूर्ण स्पर्धाच दक्षिण आफ्रिकेत खेळवली गेली तर 2014 मध्ये याच कारणास्तव काही भाग संयुक्त अरब अमिरातीत संपन्न झाला. 2019 मध्ये मात्र निवडणुका असतानाही स्पर्धा भारतात घेण्यात आली होती.
झाल्या असल्या तरी मतदानाच्या तारखा वगळून सामन्यांचे आयोजन करत बीसीसीआयने भारतातच स्पर्धा घेतली होती.
भारत-न्यूझीलंडच्या प्रमाणवेळेत
साडेसात तासांचा फरक
भारत व न्यूझीलंड यांच्यातील प्रमाणवेळेत 7.30 तासांचा फरक आहे. यामुळे, दुपारी 12.30 वाजता लढतीला सुरुवात केली तरी भारतात कार्यालयीन कामकाज करणाऱया चाहत्यांना सामन्याचा काही भाग पाहता येणार नाही. न्यूझीलंडमधील हॅमिल्टन व ऑकलंड येथे रस्ते मार्गाने जाता येते. वेलिंग्टन, ख्राईस्टचर्च, नेपियर किंवा डय़ुनेडिन या ठिकाणी जाण्यासाठी मात्र हवाई मार्गाचा अवलंब करावा लागेल.