ख्राईस्टचर्च : वेगवान गोलंदाज काईल जेमीसनने केलेल्या भेदक माऱयाच्या बळावर न्यूझीलंडने दुसऱया व शेवटच्या कसोटीत पाकिस्तानवर एक डाव 176 धावांनी दणदणीत विजय मिळवित मालिका 2-0 अशी एकतर्फी जिंकली. न्यूझीलंडने मायदेशात मिळविलेला हा सलग चौथा कसोटी विजय आहे कर्णधार केन विल्यम्सनने सामनावीर व मालिकावीर असे दोन्ही पुरस्कार पटकावले. जेमीसनने या डावात 48 धावांत 6 बळी मिळविले. मायदेशात झालेल्या दोन्ही मालिका जिंकून न्यूझीलंडने आयसीसी कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाला मागे टाकत पहिल्यांदाच अग्रस्थानावर झेप घेतली आहे.
गेल्या वर्षी भारताविरुद्ध पदार्पण केल्यानंतर सहाव्या कसोटीत जेमीसनने चौथ्यांदा पाच किंवा त्याहून जास्त बळी मिळविण्याचा पराक्रम केला आहे. पहिल्या डावातही त्याने 69 धावांत 5 बळी टिपत सामन्यात 117 धावांत 11 बळी मिळविले. चौथ्या दिवशी 362 धावांची आघाडी मिळाल्यानंतर न्यूझीलंडने डाव जाहीर केला होता.
त्यानंतर दिवसअखेर पाकने दुसऱया डावात 1 बाद 8 धवा जमविल्या होत्या आणि बुधवारी शेवटच्या दिवशी त्यांचा डाव जेमीसनच्या माऱयापुढे 186 धावांत आटोपला. टेंट बोल्टने तीन बळी मिळवित त्याला चांगली साथ दिली तर विल्यम्सननेही एक बळी मिळविला. जेमीसनने मंगळवारी मसूदला बाद करून पहिला बळी मिळविला होता. बुधवारी त्याने बाऊन्स व लेटस्विंग या घातक अस्त्राचा पुरेपूर वापर करीत पाकची आघाडी व मधली फळी कापून काढत कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे जेमीसनने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये सलामीचा फलंदाज म्हणून सुरुवात केली होती आणि गरज पडल्यास तो गोलंदाजीही करीत असे. पण नंतर त्याने गोलंदाजीवर लक्ष केंद्रित केले आणि आता तो जगातील एक घातक गोलंदाज बनला आहे. सहा कसोटीत त्याने 36 बळी टिपले असून फलंदाजीतही त्याने एका अर्धशतकासह 56.5 धावांची सरासरी राखली आहे.
बोल्टने नाईटवॉचमन मोहम्मद अब्बासला बाद केल्यानंतर जेमीसनने अबिद अली (26), हॅरिस सोहेल (15), अझहर अली (37), कर्णधार रिझवान (10) यांना दुसऱया सत्रात बाद केले. शेवटच्या सत्रात फहीम अश्रफला (28) बाद केले. सामन्यात 11 बळी ही न्यूझीलंडतर्फे नोंदवलेली चौथ्या क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी आहे. जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱया कर्णधार विल्यम्सनने फलंदाजीत विक्रमी योगदान देताना या सामन्यात निकोल्ससमवेत 369 धावांची त्रिशतकी भागीदारी केली. त्यानेही शाहीन आफ्रिदीचा बळी मिळवित कर्णधार या नात्याने पहिला बळी नोंदवला. न्यूझीलंडला अग्रस्थान पटकावण्यासाठी चारही कसोटी जिंकण्याची गरज होती. त्यांनी हा हेतू साध्य करीत विश्व कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत खेळण्याची संधीही निर्माण केली आहे.
विंडीजविरुद्ध दोन सामने डावाने जिंकल्यानंतर त्यांनी पाकवर 101 आणि एक डाव 176 धावांनी विजय मिळविले. संक्षिप्त धावफलक : पाक प.डाव 297, न्यूझीलंड प.डा 6 बाद 659 डाव घोषित, पाक दु.डाव 81.4 षटकांत सर्व बाद 186 : मसूद 0, अबिद अली 26, अब्बास 3, अझहर अली 37, सोहेल 15, फवाद आलम 16, रिझवान 10, अश्रफ 28, झफर गोहर 37, आफ्रिदी 7, नसीम शहा नाबाद 0, अवांतर 7. गोलंदाजी : जेमीसन 6-48, बोल्ट 3-43, विल्यम्सन 1-16, हेन्री 0-25, साऊदी 0-45.