तिसऱया व शेवटच्या वनडेतही 164 धावांनी एकतर्फी विजय
वेलिंग्टन / वृत्तसंस्था
डेव्हॉन कॉनवे (110 चेंडूत 126) व डॅरेल मिशेल (92 चेंडूत नाबाद 100) यांच्या पहिल्यावहिल्या शतकाच्या बळावर न्यूझीलंडने येथील तिसऱया व शेवटच्या वनडे सामन्यातही बांगलादेशचा 164 धावांनी धुव्वा उडवला आणि 3 सामन्यांची ही मालिका 3-0 अशा एकतर्फी फरकाने खिशात घातली. न्यूझीलंडने 50 षटकात 6 बाद 318 धावांचा डोंगर रचल्यानंतर प्रत्युत्तरात बांगलादेशला 42.4 षटकात सर्वबाद 154 धावांवर समाधान मानावे लागले.
दक्षिण आफ्रिकेतील जन्म असलेल्या कॉनवेने 95 चेंडूत 126 धावांची आतषबाजी केली. शिवाय, मिशेलसमवेत 159 धावांची विक्रमी भागीदारी साकारली. मिशेलने डावातील शेवटच्या 50 व्या षटकात 17 धावा वसूल केल्या आणि शेवटच्या चेंडूवर आपले शतक साजरे केले. प्रत्युत्तरात, प्रारंभी मॅट हेन्रीच्या (4-27) भेदक गोलंदाजीसमोर बांगलादेशची अक्षरशः भंबेरी उडाली.
जिम्मी नीशमने न्यूझीलंडतर्फे 27 धावात 5 बळी अशी कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी नोंदवली. ट्रेंट बोल्टने थर्डमॅनला रोमांचक झेल घेत लिटॉन दासला तंबूत धाडल्यानंतर एकवेळ तर त्यांची 3 बाद 26 अशी दैना उडाली होती आणि शेवटपर्यंत ते त्यातून सावरु शकले नाहीत. बांगलादेशतर्फे महमुदुल्लाहने एकाकी झुंज देत नाबाद 76 धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड ः 50 षटकात 6 बाद 318 (डेव्हॉन कॉनवे 110 चेंडूत 17 चौकारांसह 126, डॅरेल मिशेल 92 चेंडूत 9 चौकार, 2 षटकारांसह नाबाद 100, माटिन गप्टील 28 चेंडूत 26. अवांतर 16. रुबेल होसेन 10 षटकात 3-70, मुस्तफिजूर, तस्कीन, सौम्या सरकार प्रत्येकी 1 बळी).
बांगलादेश ः 42.4 षटकात सर्वबाद 154. (महमुदुल्लाह 73 चेंडूत 6 चौकार, 4 षटकारांसह नाबाद 76, मुश्फिकूर रहीम व लिटॉन दास प्रत्येकी 21 धावा. अवांतर 12. जेम्स नीशम 7.4 षटकात 27 धावात 5 बळी, मॅट हेन्री 10 षटकात 4-27, काईल जेमिसन 1-30).