वृत्तसंस्था/ हॅमिल्टन
पुढील वषी होणाऱया आयसीसीच्या महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी आतापासूनच न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाने आपल्या पूर्वतयारीला प्रारंभ केला आहे. न्यूझीलंडचा महिला क्रिकेट संघ आता घरच्या मैदानावर टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी क्रिकेट न्यूझीलंडने पंधरा सदस्यांचा संघ जाहीर केला आहे.
न्यूझीलंड आणि बांगलादेश महिला क्रिकेट संघामध्ये पुढील महिन्यात सहा सामने खेळविले जाणार आहेत. या सामन्यांसाठी न्यूझीलंड संघाचे नेतृत्व अनुभवी सोफी डिव्हाईनकडे सोपविण्यात आले आहे. या संघामध्ये सुझी बेट्स, ऍमेलिया केर, जेस केर, मॅडी ग्रीन, एली जेनसेन आणि अनुभवी यष्टीरक्षक जेस मॅकफिडेन यांचा समावेश आहे. बांगलादेश महिला क्रिकेट संघाचा आगामी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपूर्वीचा हा शेवटचा दौरा राहील. आयसीसीची महिलांची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत येत्या फेब्रुवारीमध्ये होणार आहे. बांगलादेश महिला संघाने यापूर्वी एकदाही न्यूझीलंडविरुद्ध द्विपक्षीय मालिका खेळलेली नाही. पण बांगलादेश महिला संघाचा चालू वर्षाच्या कालावधीतील हा न्यूझीलंडचा दुसरा दौरा आहे. उभय संघातील पहिला टी-20 सामना 2 डिसेंबरला हॅग्ले ओव्हल मैदानावर होणार आहे. न्यूझीलंड संघ- सोफी डिव्हाईन (कर्णधार), सुझी बेट्स, ईडेन कॅरेसन, लॉरेन डाऊन, मॅडी ग्रीन, बुकी हॅलिडे, हेली जेनसेन, फ्रेन जोनास, ऍमिलिया केर, जेस केर, जेस मॅकफिडेन, मॉली पेनफोल्ड, हॅना रोव्हे, जॉर्जिया प्लीमेर आणि ली तेहुहु.