वृत्तसंस्था/ हॅमिल्टन
यजमान न्यूझालंडने रविवारी खेळाच्या चौथ्या दिवशी पहिल्या कसोटीत विंडीजचा एक डाव आणि 134 धावांनी दणदणीत पराभव करत या मालिकेत आघाडी मिळविली आहे. या कसोटीत न्यूझीलंडचा कर्णधार विल्यम्सनने कसोटी क्रिकेटमधील आपली सर्वोच्च धावसंख्या (251) नोंदविली. विल्यम्सनचे कसोटीतील हे तिसरे द्विशतक आहे.
या कसोटीत न्यूझीलंडच्या फलंदाजांनी आणि त्यानंतर गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत विंडीजला एकतर्फी पराभूत केले. अलिकडच्या कालावधीत न्यूझीलंडने आपल्या घरच्या मैदानावर चारही कसोटी सामने जिंकले आहेत. न्यूझीलंडच्या आयसीसीच्या कसोटी मानांकनात पहिल्या दोन संघामध्ये स्थान मिळण्याची शक्यता असून आगामी ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील कसोटी मालिकेनंतर न्यूझीलंडचे स्थान निश्चित होईल.
या पहिल्या कसोटीत न्यूझीलंडने आपला पहिला डाव 7 बाद 513 धावांवर घोषित केला. सामन्यातील तिसऱया दिवशी न्यूझीलंडच्या फलंदाजांनी विंडीजचे 16 गडी बाद केले त्यामुळे विंडीजला फॉलोऑन स्वीकारावा लागला. विंडीजचा पहिला डाव 138 धावांत आटोपल्यानंतर विंडीजने दुसऱया डावात चिवट फलंदाजी करत तिसऱया दिवसाअखेर 6 बाद 196 धावा जमविल्या होत्या. रविवारी खेळाच्या चौथ्या दिवशी न्यूझीलंडने विंडीजचे शेवटचे चार गडी 51 धावांत बाद केले. विंडीजचा दुसरा डाव 247 धावांवर समाप्त झाला. विंडीजच्या ब्लॅकवूड आणि जोसेफ यांनी 7 व्या गडय़ासाठी 155 धावांची भागिदारी केली. जेमीसनने जोसेफला झेलबाद केले. त्याने 3 षटकार आणि 9 चौकारांसह 86 धावा जमविल्या. वेडीजची ही जोडी फुटल्यानंतर न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी विंडीजचे तीन फलंदाज लवकर गुंडाळले. ब्लॅकवूडने शानदार शतक झळकविताना 141 चेंडूत 2 षटकार आणि 11 चौकारांसह 104 धावा झळकविल्या. तो नवव्या गडय़ाच्या रूपात बाद झाला. विंडीजचा दुसरा डाव 247 धावांत आटोपला. न्यूझीलंडच्या वॅग्नरने 66 धावात 4, जेमीसनने 42 धावांत 2 तर साऊदी, बोल्ट, मिचेल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. विंडीजचा शेवटचा फलंदाज डॉवरिच दुखापतीमुळे फलंदाजी करू शकला नाही.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड प. डाव- 7 बाद 519 डाव घोषित, विंडीज प. डाव- 64 षटकांत सर्वबाद 138, विंडीज दु. डाव 58.5 षटकांत 9 बाद 247 ( ब्लॅकवूड 104, जोसेफ 86, ब्रॅव्हो 12, ब्रेथवेट 6, वॅग्नर 4-66, जेमीसन 2-42, साऊदी 1-62, बोल्ट 1-63, मिचेल 1-7).