विंडीजवर ‘फॉलोऑन’ची नामुष्की, 16 बळींसह तिसरा दिवस गोलंदाजांचा
वृत्तसंस्था/ हॅमिल्टन
यजमान न्यूझीलंडचा संघ पहिल्या क्रिकेट कसोटीत विंडीजवर मोठा विजय मिळविण्याच्या दिशेने मार्गोत्क्रमण करीत आहे. न्यूझीलंडकडून विंडीजला ‘फालोऑन’ स्वीकारावा लागला. शनिवारी खेळाचा तिसरा दिवस न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी गाजविताना विंडीजचे 16 बळी मिळविले. न्यूझीलंडने विंडीजला पहिल्या डावात 138 धावांत गुंडाळल्यानंतर विंडीजची दिवसअखेर दुसऱया डावात स्थिती 6 बाद 196 अशी केविलवाणी आहे. यजमान न्यूझीलंड रविवारी विंडीजवर डावाने विजय मिळविणार हे निश्चित झाले आहे.
या पहिल्या कसोटीत न्यूझीलंडचा संघ शनिवारी खेळाच्या तिसऱया दिवशी डावाने विजय मिळवेल, असे वाटत होते पण विंडीजच्या ब्लॅकवूड आणि जोसेफ यांनी सातव्या गडय़ासाठी केलेल्या चिवट नाबाद शतकी भगिदारीमुळे न्यूझीलंडचा विजय लांबला गेला. कर्णधार विलीयमसनच्या दमदार द्विशतकाच्या जोरावर न्यूझीलंडने आपला पहिला डाव 7 बाद 519 दावांवर घोषित केल्यानंतर विंडीजने शुक्रवारी पहिल्या डावात बिनबाद 49 धावा जमविल्या होत्या.
या धावसंख्येंवरून विंडीजने तिसऱया दिवशीच्या खेळाला प्रारंभ केला आणि त्याचा सलामीचा फलंदाज कँपबेल साऊदीच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने 1 षटकार आणि दोन चौकारांसह 26 धावा जमविताना ब्रेथवेटसमवेत सलामीच्या गडय़ासाठी 53 धावांची भागिदारी केली.
न्यूझीलंडच्या अचूक आणि भेदक गोलंदाजीसमोर विंडीजचे 9 फलंदाज 86 धावांत तंबूत परतले. विंडीजचा पहिला डावा 64 षटकांत 138 धावांत आटोपला. विंडीजच्या डावात सलामीच्या ब्रेथवेटने 1 चौकारांसह 21 कर्णधार होल्डरने 3 चौकारांसह नाबाद 25, ब्लॅकवूडने 3 चौकारांसह 23 चेसने 2 चौकारांसह 11 धावा जमविल्या. विंडीजच्या एकाही फलंदाजांला 30 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. न्यूझीलंडतर्फे टीम साऊदीने 35 धावांत 4, जेमीसन आणि वेग्नर यांनी प्रत्येकी 2 तर बोल्टने एक गडी बाद केला. विंडीजचा संघ 381 धावांनी पिछाडीवर राहिल्याने न्यूझीलंडकडून त्यांना ‘फॉलोऑन’ स्वीकारावा लागला. खेळाच्या पहिल्या सत्रातच विंडीजचा पहिला डाव संपुष्टात आला.
फालोऑन स्वीकारल्यानंतर विंडीजच्या दुसऱया डावालाही चांगली सुरूवात झाली नाही. पावसामुळे काही मिनिटाचा खेळ वाया गेला. खेळाला पुन्हा सुरूवात झाल्यानंतर चहापानापर्यंतच्या दुसऱया सत्रात विंडीजने दुसऱया डावात 4 गडी केवळ 30 धावांत गमविले. सलामीचा ब्रेथवेट 10, कँपबेल 2, ब्रॅव्हो 12, ब्रुक्स 2 धावावर तंबूत परतले. चहापानानंतर खेळाच्या शेवटच्या सत्राला प्रारंभ झाला आणि न्यूझीलंडच्या जेमीसनने चेसला 6 धावांवर पायचीत केले.
मिचेलने कर्णधार होल्डरला 8 धावांवर पायचीत केल्याने विंडीजची दुसऱया डावात स्थिती 6 बाद 89 अशी केविलवाणी झाली. दरम्यान ब्ल्Ÿढकवूड आणि जोसेफ या जोडीने चिवट फलंदाजी करत सातव्या गडय़ासाठी अभेद्य 107 धावांची भागिदारी केल्याने न्यूझीलंडला विजयासाठी रविवारी चौथ्या दिवसाची वाट पाहावी लागली. ब्लॅकवूड दोन षटकार आणि 9 चौकारांसह 98 चेंडूत 80 धावांवर तर जोसेफ 1 षटकार आणि 9 चौकारांसह 73 चेंडूत 59 धावांवर खेळत आहे. विंडीजने खेळाच्या तिसऱया दिवशी दुसऱया डावात 42 षटकांत 6 बाद 196 धावा जमविल्या आहेत. न्यूझीलंडतर्फे वेग्नरने दोन तर साऊदी, बोल्ट, जेमीसन आणि मिचेल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. विंडीजचा संघ अद्याप 185 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे4 गडी खेळावयाचे आहेत.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड प. डाव- 7 बाद 519 डाव घोषित, विंडीज प. डाव 64 षटकांत सर्वबाद 138 ( कँपबेल 26, ब्रेथवेट 21, होल्डर नाबाद 25, ब्लॅकवूड 23, चेस 11, साऊदी 4-35, जेमीसन 2-25, वेग्नर 2-33, बोल्ट 1-30), विंडीज दु. डाव- 42 षटकांत 6 बाद 196 (ब्लॅकवूड खेळत आहे 80, जोसेफ खेळत आहे 59 ब्रॅव्हो 12, ब्रेथवेट 10, वेग्नर 2-62, बोल्ट, साऊदी, जेमीसन, मिचेल प्रत्येकी एक बळी).