वृत्तसंस्था/ हॅमिल्टन
यजमान न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत हॉलंडवर 2-0 अशी विजयी आघाडी मिळविली. या मालिकेतील शनिवारी झालेल्या दुसऱया सामन्यात न्यूझीलंडने हॉलंडचा 118 धावांनी दणदणीत पराभव केला.
शनिवारच्या दुसऱया सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 50 षटकात 9 बाद 264 धावा जमविल्या. त्यानंतर हॉलंडचा डाव 34.1 षटकांत 146 धावांत आटोपला.
न्यूझीलंडच्या डावामध्ये टॉम लॅथमने 123 चेंडूत नाबाद 140 धावांची खेळी केली. लॅथमने कप्तानी खेळी करण्यापूर्वी न्यूझीलंडची स्थिती 23 षटकाअखेर 6 बाद 89 अशी केविलवाणी होती. वनडे क्रिकेटमध्ये लॅथमची ही सर्वोत्तम खेळी असून त्याने नाबाद 140 धावांत 5 षटकार आणि 10 चौकार ठोकले.
हॉलंडतर्फे व्हॅन बेकने 56 धावांत 4 तर क्लेसनने 36 धावांत 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना हॉलंडच्या डावात डिलेडीने 37 तर विक्रमजीत सिंगने 31 धावा जमविल्या. न्यूझीलंडतर्फे ब्रेसवेलने तीन तर सोधीने 2 गडी बाद केले. या सामन्यातील विजयामुळे न्यूझीलंड संघाने आयसीसी विश्वचषक सुपर लीग स्पर्धेच्या गुणतक्त्यात 11 व्या स्थानावरून आठव्या स्थानावर झेप घेतली आहे.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड- 50 षटकांत 9 बाद 264 (लॅथम नाबाद 140, व्हॅन बेक 4-56, क्लेसन 3-36), हॉलंड 34.1 षटकांत सर्वबाद 146 (डिलेडी 37, विक्रमजीत सिंग 31, ब्रेसवेल 3-13, सोधी 2-17)