वृत्तसंस्था/ कराची
न्यूझीलंडचा क्रिकेट संघ 2023 सालातील एप्रिल महिन्यात पाकचा दौऱयावर जाणार आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये रद्द करण्यात आलेल्या मर्यादित षटकांच्या मालिका या आगामी दौऱयात खेळविल्या जातील, अशी माहिती पीसीबीचे अध्य़क्ष रमीझ राजा यांनी दिली.
2023 च्या एप्रिल महिन्यात न्यूझीलंडचा क्रिकेट संघ पाकचा दौरा करणार असून या दौऱयात 10 मर्यादित षटकांचे सामने आयोजित केले आहेत. त्याचप्रमाणे 2022 साली न्यूझीलंड आणि पाक यांच्यात दोन कसोटी आणि तीन वनडे सामने खेळविले जाणार आहेत. न्यूझीलंडचा क्रिकेट संघ डिसेंबर- जानेवारी 2022-23 या कालावधीत पाकचा दौरा करणार आहे. यामध्ये दोन कसोटी आणि तीन वनडे सामने आयोजित केले आहेत. आगामी दौरा कार्यक्रमानुसार न्यूझीलंडचा संघ 2023 एप्रिलमध्ये पाकमध्ये दाखल होणार असून या दौऱयात पाच वनडे आणि पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळविली जाणार आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये उभय संघातील टी-20 मालिका रद्द करण्यात अली होती.
डिसेंबर-जानेवारी 2022-23 या कालावधीत उभय संघातील दोन कसोटी सामने आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियन्सशीप अंतर्गत खेळविली जाणार आहे तर तीन वनडे सामने आयसीसीच्या पुरूषांच्या विश्व चषक सुपर लीग स्पर्धा अंतर्गत राहतील. उभय संघातील पहिली कसोटी रावळपिंडीत खेळविली जाणार आहे. मार्च 2022 ते एप्रिल 2023 या कालावधीत पाकमध्ये आठ कसोटी, 11 वनडे आणि 13 टी-20 सामने खेळविले जाणार असून ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड हे तीन संघ पाकचा दौरा करणार असल्याचे रमीझ राजा यांनी सांगितले. अलिकडेच कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने विंडीजने आपला पाकचा दौरा अर्धवट सोडून मायदेशी जाण्याचा निर्णय घेतला. विंडीजच्या चमूमध्ये अनेकांना कोरोनाची बाधा झाल्याने त्यांनी हा दौरा सोडून जाण्याचा निर्णय घेतला. पुढीलवर्षीच्या प्रारंभी ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ 1998 नंतर पहिल्यांदाच पाकचा दौरा करणार आहे. या दौऱयानंतर इंग्लंड आणि न्यूझीलंडचे संघ पाकमध्ये मालिका खेळण्यासाठी येणार आहेत.