चिलीत इटलीपेक्षा अधिक रुग्ण : जगभरात 90 लाख 72 हजार 12 कोरोनाबाधित
जगभरात कोरोना महामारीमुळे आतापर्यंत 4 लाख 71 हजार 167 जण दगावले आहेत. तर बाधितांचे प्रमाण 90 लाख 72 हजार 12 वर पोहोचले आहे. जगात आतापर्यंत 48 लाख 54 हजार 700 बाधितांना या संसर्गापासून मुक्तता मिळाली आहे. संसर्गामुळे न्यूझीलंडने देशात दाखल होऊ पाहणाऱया क्रूजवरील बंदी वाढविली आहे. पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी याची पुष्टी दिली आहे. 30 जून रोजी संपुष्टात येणारी ही बंदी अनिश्चित काळासाठी वाढविण्यात आली आहे. तर चिलीमध्ये कोरोना बाधितांची संख्या इटलीपेक्षा अधिक झाली आहे. चिलीत बाधितांचे प्रमाण 2,42,355 झाले आहे. तर इटलीत 2,38,499 रुग्ण सापडले आहेत.
एचसीक्यूच्या दोन मोठय़ा चाचण्या बंद , अमेरिकेच्या यंत्रणेचा निर्णय
हायड्रॉक्सी क्लोरोक्विन संदर्भात करण्यात येत असलेल्या दोन क्लीनिकल ट्रायल्स रोखण्यात आल्याची माहिती अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टीटय़ूट ऑफ हेल्थने दिली आहे. औषध प्रभावी नसणे आणि चाचणीकरता लोकांचा अल्प प्रतिसाद अशी दोन कारणे देण्यात आली आहेत. एका स्वतंत्र निरीक्षण मंडळाने हायड्रॉक्सी क्लोरोक्विन औषध रुग्णालयात दाखल रुग्णांना लाभ पोहोचवित नसल्याचे म्हटले आहे.
एचसीक्यूच्या अध्ययनात 2 हजार लोकांना सामील करण्याची योजना होती, परंतु केवळ 20 रुग्णांनीच तयारी दर्शविली होती. एचसीक्यूचा कोरोना संसर्ग रोखण्यास लाभ होत असल्याचे दिसून आलेले नाही. हे औषध बाजूला ठेवून अन्य प्रभावी औषधांविषयी विचार केला जावा असे मत वेंडरबिल्ट युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरमधील इंफेक्शियन डिसिजचे प्राध्यापक डॉक्टर विलियम शेफ्नर यांनी व्यक्त केले आहे.
फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनने सोमवारी स्वतःच्या रुग्णालयात दाखल रुग्णांना हायड्रॉक्सी क्लोरोक्विन आणि क्लोरोक्विन देण्याची अनुमती मागे घेतली आहे. औषध उपयुक्त असल्याची शक्यता दिसून न आल्याने हा निर्णय घेतल्याने संस्थेने म्हटले आहे.
मेक्सिको : 1,044 बळी
उत्तर अमेरिकेतील मेक्सिको या देशात 1,80,545 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. दिवसभरात तेथे 5,343 नवे बाधित सापडले आहेत. तर 1,044 जणांना या संसर्गामुळे जीव गमवावा लागला आहे. उत्तर अमेरिका खंडात अमेरिकेनंतर (23 लाखांपेक्षा अधिक) सर्वाधिक रुग्ण मेक्सिकोतच आढळून आले आहेत. मेक्सिकोतील बळींचे एकूण प्रमाण 21,825 झाले आहे.
स्पेन : 141 नवे रुग्ण
स्पेनमध्ये मागील 24 तासांमध्ये 141 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर एका बाधिताचा मृत्यू ओढवला आहे. देशात आतापर्यंत 28,323 जणांचा बळी गेला आहे. तर 2 लाख 93,352 जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. नव्या रुग्णांमध्ये माद्रिद येथे 55, एरगोन क्षेत्रात 33 आणि कॅटलोनियामधील 25 जणांचा समावेश आहे. स्पेनमध्ये रविवारपासून लोकांना ये-जा करण्याची अनुमती देण्यात आली आहे. तर युरोपीय देशांमधील लोकांना प्रवेश देण्यासाठी सीमा खुली करण्यात आली आहे.
बीजिंग : 9 नवे रुग्ण
चीनची राजधानी बीजिंगमध्ये 9 नवे रुग्ण आढळून आले आहेत. महापालिकेने 5 जणांपैकी 2 जण संशयित रुग्ण असल्याची माहिती दिली आहे. तर 5 जणांमध्ये कुठलीच लक्षणे दिसून आलेली नाहीत. आरोग्य आयोगानुसार बीजिंगमध्ये 11 जून ते 21 जूनपर्यंत 236 रुग्ण सापडले आहेत. हे सर्व रुग्ण देशांतर्गत संसर्गाशी संबंधित आहेत.
हेग : निदर्शक अटकेत
नेदरलँडच्या हेग शहरात टाळेबंदीच्या विरोधात निदर्शने करणाऱया 400 नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्या 400 जणांपैकी बहुतांश जणांची मुक्तता करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी ट्विटद्वारे दिली आहे. मालिवल्ड मैदानात निदर्शने शांततेत सुरू झाली असली तरीही फुटबॉल समर्थकांनी पोलिसांसोबत झटापट केली होती. या लोकांनी पोलिसांवर दगडफेकही केली. हिंसक निदर्शकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रूधूराचा वापर केला आहे.
कॅलिफोर्नियात रुग्ण वाढले
अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतात मागील 24 तासांमध्ये 4,515 नवे रुग्ण आढळून आले आहेत. प्रांतातील कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असल्याने अनेक उपाययोजना हाती घ्याव्या लागल्या आहेत. तत्पूर्वी शुक्रवारी सर्वाधिक 4,317 नवे रुग्ण सापडले होते. मागील 5 दिवसांमध्ये 20,200 पेक्षा अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
7 हजारांपेक्षा अधिक बळी
चिलीनमध्ये कोरोना महामारीमुळे 7 हजारांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने बळींचा आकडा 3,069 ने वाढविला आहे. पहिल्यांदाच सरकारने नव्या गणनेच्या पद्धतीसंबंधी अधिकृतपणे खुलासा केला आहे. देशातील बळींचा आकडा आतापर्यंत 4,075 दर्शविण्यात आला होता. तर देशात बाधितांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. चिलीमध्ये मागील 24 तासांमध्ये 5,607 नवे रुग्ण सापडले आहेत.