वृत्तसंस्था/ नेपियर
यजमान न्यूझीलंडने बांगलादेशविरूद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी मिळविली. या मालिकेतील मंगळवारी झालेल्या दुसऱया सामन्यात न्यूझीलंडने बांगलादेशचा डकवर्थ- लेवीस नियमाच्या आधारे 28 धावांनी पराभव केला. न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 20 षटकांत 5 बाद 173 धावा जमविल्या. त्यानंतर बांगलादेशचा डाव सुरू झाल्यानंतर पावसाचा अडथळा आल्याने पंचांनी त्यांना 16 षटकांत विजयासाठी 171 धावांचे नवे उद्दिष्ट दिले. बांगलादेशने 16 षटकांत 7 बाद 142 धावा जमविल्याने त्यांना या मालिकेत सलग दुसरा पराभव पत्करावा लागला.
न्यूझीलंडच्या डावामध्ये ग्लेन फिलिप्सने 31 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह नाबाद 58, मिचेलने 16 चेंडूत 6 चौकारांसह नाबाद 34 धावा जमविल्या. या जोडीने सहाव्या गडय़ासाठी अभेद्य 62 धावांची भागिदारी केली. सलामीच्या ग्युप्टीलने 18 चेंडूत 1 षटकार आणि दोन चौकारांसह 21, ऍलेनने 10 चेंडूत 1 षटकार आणि दोन चौकारांसह 17, कॉनवेने 9 चेंडूत 2 चौकारांसह 15, यंगने 17 चेंडूत 1 षटकारांसह 14, चॅपमनने 1 चौकारांसह 7 धावा जमविल्या. न्यूझीलंडच्या डावात 5 षटकार आणि 18 चौकार नोंदविले गेले. बांगलादेशतर्फे मेहदी हसनने 2 तर सैफूउद्दीन, टी.अहमद, एस इस्लाम यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना बांगलादेशच्या डावात सलामीच्या मोहमद नईमने 35 चेंडूत 4 चौकारांसह 38, दासने 1 चौकारांसह 6, सौम्या सरकारने 27 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांसह 51, कर्णधार मेहमुदुल्लाने 12 चेंडूत 4 चौकारांसह 21, हुसेनने 2, मिथुनने 1, हसनने 6 चेंडूत 1 षटकारासह नाबाद 12, सैफूद्दीनने 3 धावा जमविल्या. न्यूझीलंडतर्फे साऊदी, बेनेट आणि मिल्ने यांनी प्रत्येकी 2 तर फिलिप्सने 1 गडी बाद केला. बांगलादेशच्या डावात 4 षटकार आणि 14 चौकार नोंदविले गेले. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना ऑकलंडमध्ये गुरूवारी होणार आहे. न्यूझीलंडने या उन्हाळी मोसमात मायदेशातील सर्व मालिका जिंकण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड 20 षटकांत 5 बाद 173 (फिलिप्स नाबाद 58, मिचेल नाबाद 34, ग्युप्टील 21, ऍलेन 17, कॉनवे 15, यंग 14, चॅपमन 7, हसन 2-45, सेफूद्दीन,. टी. अहमद आणि एस. इस्लाम प्रत्येकी एक बळी)
बांगलादेश- (16 षटकांत विजयासाठी 171 धावांचे उद्दीष्ट), 16 षटकांत 7 बाद 142 (सरकार 51, नईम 38, दास 6, मेहमुदुल्ला 21, हुसेन 2, मिथुन 1, हसन नाबाद 12, सैफूउद्दीन 3, साऊदी 2-21, बेनेट 2-31, मिल्ने 2-34, फिलिप्स 1-20).