वृत्तसंस्था/ वेलिंग्टन
यजमान न्यूझीलंडने बांगलादेशविरूद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी मिळविली आहे. या मालिकेतील मंगळवारी झालेल्या दुसऱया सामन्यात न्यूझीलंडने बांगलादेशचा 5 गडय़ांनी पराभव पेला. न्यूझीलंडतर्फे टॉम लॅथमचे नाबाद शतक महत्त्वाचे ठरले.
या दुसऱया सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजी दिली. बांगलादेशने 50 षटकांत 6 बाद 271 धावा जमविल्या. बांगलादेशतर्फे तमीम इक्बाल आणि मोहम्मद मिथुन यांनी शानदार अर्धशतके झळकविली. त्यानंतर न्यूझीलंडने 5 बाद 275 धावा जमवित हा सामना 5 गडय़ांनी आणि 10 चेंडू बाकी ठेवून जिंकला. या मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने बांगलादेशचा 8 गडय़ांनी पराभव केला होता. वनडेतील पाचवे शतक झळविणाऱया लॅथमला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. त्याने 108 चेंडूत 10 चौकारांसह नाबाद 110 झळकविल्या. या सामन्यात न्यूझीलंडच्या जेमीसनने स्वतःच्या गोलंदाजीवर बांगलादेशच्या तमीम इक्बालचा 34 धावांवर झेल टिपला. मैदानावरील पंचांनी इक्बालला बाद म्हणून घोषित केले. पण तृतीय पंच ख्रिस गॅफनी यांनी तमीम नाबाद असल्याचे जाहीर केले. जेमीसन हा झेल टिपताना मैदानावर पडला आणि त्याच्या हातातील चेंडू खेळपट्टीवर पडल्याचे रिप्लेमध्ये दिसून आले.
बांगलादेशच्या डावामध्ये सलामीचा फलंदाज आणि कर्णधार तमीम इक्बालने 11 चेंडूत 78, सरकारने 1 षटकार आणि 3 चौकारांसह 32, रहीमने 3 चौकारांसह 34, मोहम्मद मिथूनने 57 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांसह नाबाद 73, मेहमूदुल्लाने 1 चौकारांसह 16 धावा जमविल्या. तमीम इक्बाल आणि सरकार यांनी दुसऱया गडय़ासाठी 81 धावांची भागिदारी केली. न्यूझीलंडतर्फे सँटनरने दोन तर बोल्ट, हेन्री आणि जेमीसन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. बांगलादेशच्या डावात 4 षटकार आणि 24 चौकार नोंदविले गेले.
प्रत्त्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडने 48.2 षटकात 5 बाद 275 धावा जमविल्या. सलामीच्या गुप्टीलने 1 षटकार आणि 3 चौकारांसह 20, निकोल्सने 13, कॉनवेने 92 चेंडूत 5 चौकारांसह 72, लॅथमने 108 चेंडूत 10 चौकारांसह नाबाद 110, नीशमने 34 चेंडूत 2 चौकारांसह 30, मिचेलने नाबाद 12 धावा जमविल्या. न्यूझीलंडच्या डावात 1 षटकार आणि 25 चौकार नोंदविले गेले. बांगलादेशतर्फे रेहमान आणि मेहदी हसन यांनी प्रत्येकी प्रत्येकी दोन गडी बाद केले. लॅथम आणि कॉनवे यांनी चौथ्या गडय़ासाठी 113 धावांची भागिदारी केली. तसेच लॅथमने नीशमसमवेत पाचव्या गडय़ासाठी 76 धावांची भर घातली. आता या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना वेलिंग्टनमध्ये येत्या शुक्रवारी होणार आहे. संभाव्य व्हाईटवॉश टाळण्यासाठी बांगलादेशला शेवटच्या सामन्यात फलंदाजीत सुधारणा करावी लागणार आहे.
संक्षिप्त धावफलक ः बांगलादेश 50 षटकांत 6 बाद 271 (तमीम इक्बाल 78, मोहम्मद मिथुन नाबाद 73, सरकार 32, रहीम 34, मेहमूदुल्ला 16, सँटनर 2-51, बोल्ट, हेन्री, जेमीसन प्रत्येकी एक बळी). न्यूझीलंड 48.2 षटकांत 5 बाद 275 (लॅथम नाबाद 110, कॉनवे 72, नीशम 30, गुप्टील 20, निकोल्स 13, मिचेल नाबाद 12, रेहमान 2-62, मेहदी हसन 2-42).