ऑकलंड : न्यूझीलंडचे सर्वात वयस्कर माजी कसोटीपटू व माजी कर्णधार जॉन रीड यांचे वयाच्या 92 व्या वर्षी बुधवारी निधन झाल्याचे क्रिकेट न्यूझीलंडने सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी नोर्ली व ऍलिसन, रिचर्ड व ऍन अशी तीन अपत्ये आहेत.
50 चे दशक आणि 60 च्या सुरुवातीच्या काळात जगातील सर्वोत्तम अष्टपैलू अशी त्यांनी ओळख निर्माण केली होती. त्यांनी 34 कसोटीत न्यूझीलंडचे नेतृत्व केले असून न्यूझीलंडने मिळविलेले पहिले तीन विजय त्यांच्या नेतृत्वाखालीच मिळविले होते. त्यांच्या निधनाचे कारण मात्र क्रिकेट न्यूझीलंडने दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलेले नाही. त्यांचा जन्म ऑकलंडमध्ये झाला, पण शिक्षण वेलिंग्टनमध्ये पूर्ण झाले. त्यांनी एकूण 246 प्रथमश्रेणी सामने खेळले असून त्यात 41.35 च्या सरासरीने 39 शतकांसह 16,128 धावा जमविल्या. याशिवाय गोलंदाजीत 22.60 च्या सरासरीने 466 बळीही मिळविले. ते तडाखेबाज फलंदाज आणि वेगवान गोलंदाज होते. त्यांनी एकूण 58 कसोटीत न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व केले.
असून 1949 साली 19 व्या वर्षी त्यांनी कसोटी पदार्पण केले होते. त्यांनी 33.28 च्या सरासरीने 6 शतकांसह 3428 धावा आणि 33.35 च्या सरासरीने 85 बळी मिळविले होते. 1961 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्ग येथे झालेल्या कसोटीत त्यांनी 142 ही वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या नोंदवली होती. 1965 मध्ये ते निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी निवड समिती सदस्य, व्यवस्थापक व आयसीसी सामनाधिकारी अशा भूमिकाही पार पाडल्या