वृत्त संस्था/ वेलिंग्टन
जून महिन्यात इंग्लंडच्या दौऱयावर दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी जाणाऱया त्याचप्रमाणे आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियन्सशीप स्पर्धेतील अंतिम सामन्यात खेळणाऱया न्यूझीलंडच्या खेळाडूंना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.
संपूर्ण जगामध्ये कोरोनाच्या दुसऱया लाटेचा प्रसार सुरू झाला असल्याने न्यूझीलंडच्या प्रशासनाने महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱया न्यूझीलंडच्या खेळाडूंना कोरोना लसीची सक्ती केली आहे. 23 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान होणाऱया टोकियो ऑलिंपिक स्पर्धेसाठी प्रयाण करणाऱया न्यूझीलंडच्या पथकातील ऍथलिटसना देखील कोरोनाची पहिली लस देण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला आहे.
न्यूझीलंडचा क्रिकेट संघ 2 जूनला इंग्लंडच्या दौऱयावर जाणार आहे. या दौऱयात उभय संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जात आहे. त्याचप्रमाणे 18 जून रोजी साऊदम्पटन येथे आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियन्सशीप स्पर्धेतील न्यूझीलंड-भारत यांच्यात अंतिम लढत होणार आहे. न्यूझीलंड संघातील वेगवान गोलंदाज वेग्नर याचे कोरोना लस घेत असतानाचे छायाचित्र क्रिकेट न्यूझीलंडने आपल्या ट्विटरवर प्रसिद्ध केले आहे. न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंना कोरोना लसीचा दुसरा डोस मे महिन्यात दिला जाणार आहे.
न्यूझीलंडचे कसोटी क्रिकेटपटू केन विल्यम्सन, सँटेनर, बोल्ट आणि जेमिसन हे सध्या भारतात सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत खेळत आहेत. न्यूझीलंडचा अष्टपैलू ग्रॅण्डहोम हा दुखापतीतून पूर्ण बरा झाला असून तो सराव शिबिरात दाखल झाला आहे. आपण खेळण्यास सज्ज असल्याचे ग्रँण्डहोमने क्रिकेट न्यूझीलंडला कळविले आहे.