दुसरी टी-20 जिंकून विंडीजवर न्यूझीलंडची विजयी आघाडी
वृत्तसंस्था/ वेलिंग्टन
सामनावीर ग्लेन फिलिप्सने न्यूझीलंडतर्फे नोंदवलेल्या सर्वात वेगवान टी-20 शतकाच्या बळावर न्यूझीलंडने येथे झालेल्या दुसऱया टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात विंडीजवर 72 धावांनी दणदणीत विजय मिळविला. तीन सामन्यांच्या या मालिकेत न्यूझीलंडने 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. फिलिप्सने केवळ 46 चेंडूत शतक पूर्ण केले.
मध्यफळीतील फलंदाज असलेल्या फिलिप्सने 51 चेंडूंच्या खेळीत 10 चौकार, 8 षटकारांची आतषबाजी करीत 108 धावा झोडपल्या. त्याला कॉनवेने नाबाद 65 धावांची खेळी करीत चांगली साथ दिल्यामुळे न्यूझीलंडने 20 षटकांत 3 बाद 238 धावांचा डोंगर उभारला. या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत राहिल्याने 20 षटकांत त्यांना 9 बाद 166 धावांपर्यंतच मजल मारता आली. यापूर्वी कॉलिन मुनरोने 2018 मध्ये याच मैदानावर झालेल्या विंडीजविरुद्धच्या सामन्यात 47 चेंडूत शतक नोंदवले होते. त्याचा हा विक्रम फिलिप्सने येथील सामन्यात मागे टाकला.
विंडीजच्या एकाही गोलंदाजाला प्रभावी कामगिरी करता आली नाही. कीमो पॉल तर सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने 4 षटकांत तब्बल 64 धावा दिल्या. 23 वर्षीय फिलिप्सने देव्हॉन कॉनवेसमवेत तिसऱया गडय़ासाठी 184 धावांची भागीदारी केली. कॉनवेने 37 चेंडूत नाबाद 65 धावा फटकावल्या. याशिवाय ग्युप्टिलने 23 चेंडूत 34, सीफर्टने 13 चेंडूत 18 धावा जमविल्या. थॉमस, ऍलेन, पोलार्ड यांनी एकेक बळी मिळविला. विंडीजच्या डावात फ्लेचर, मेयर्स यांनी प्रत्येकी 20, हेतमेयरने 25, कर्णधार पोलार्डने 15 चेंडूत 28, कीमो पॉलने नाबाद 26, ऍलेनने 15 धावा काढल्या. न्यूझीलंडच्या जेमीसन, सँटनर यांनी प्रत्येकी 2, नीशम, सोधी, फर्ग्युसन, साऊदी यांनी एकेक बळी मिळविला.
संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड 20 षटकांत 3 बाद 238 : फिलिप्स 51 चेंडूत 10 चौकार, 8 षटकारांसह 108, कॉनवे 37 चेंडूत 4 चौकार, 4 षटकारांसह नाबाद 65, ग्युप्टिल 23 चेंडूत 5 चौकार, 2 षटकारांसह 34, सीफर्ट 13 चेंडूत 3 चौकारांसह 18, टेलर नाबाद 0, अवांतर 13. गोलंदाजी : ओशेन थॉमस 1-44, ऍलेन 1-35, पोलार्ड 1-33. विंडीज 20 षटकांत 9 बाद 166 : फ्लेचर 14 चेंडूत 20, हेतमेयर 32 चेंडूत 25, मेयर्स 14 चेंडूत 20, पूरन 7, पोलार्ड 15 चेंडूत 28, पॉवेल 9, ऍलेन 15, पॉल 18 चेंडूत नाबाद 26, अवांतर 15. गोलंदाजी : जेमीसन 2-15, सँटनर 2-41, साऊदी 1-49, फर्ग्युसन 1-22, सोधी 1-26, नीशम 1-12.