भारताचा कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणेचे प्रतिपादन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय फलंदाजांच्या तंत्रशुद्धतेबद्दल चिंता नाही. पण, वेलिंग्टन व ख्राईस्टचर्च येथील वाऱयाची झुळूक कशी असेल, यावर बरीच समीकरणे अवलंबून असतील. यामुळे, तेथे खऱया अर्थाने तंत्रशुद्धतेची परीक्षा होईल, असे प्रतिपादन भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने केले. भारत पुढील महिन्यात न्यूझीलंड दौऱयावर जाणार असून तेथे 5 टी-20 व 3 वनडे सामन्यानंतर वेलिंग्टन (21 ते 25 फेब्रुवारी) व ख्राईस्टचर्च (29 फेब्रुवारी ते 4 मार्च) येथे दोन कसोटी सामने खेळणार आहे.
महेंद्रसिंग धोनीच्या संघाने 2009 मध्ये जे यश संपादन केले, त्या यशाशी स्पर्धा करण्याची संधी या दौऱयात असेल, असे अजिंक्य रहाणे म्हणतो. ‘मागील दौऱयात मी वेलिंग्टनमध्ये खेळलो. पण, ख्राईस्टचर्चमध्ये आपण प्रदीर्घ कालावधीनंतर कसोटी सामना खेळत आहोत. न्यूझीलंडमधील वातावरणाशी शक्य तितक्या लवकर जुळवून घेणे महत्त्वाचे ठरेल’, असे त्याला वाटते.
ऑस्ट्रेलिया व इंग्लंडविरुद्ध भेदक प्रदर्शन साकारणाऱया जलद गोलंदज नील वॅग्नरचा रहाणेने येथे आवर्जून उल्लेख केला. ‘वॅग्नरने अलीकडील मालिकेत उत्तम प्रदर्शन (4 कसोटीत 27 बळी) साकारले. अर्थात, केवळ एकाच खेळाडूवर लक्ष केंद्रित करुन चालणार नाही. सांघिक फलंदाजीचा विचार करता प्रत्येक प्रतिस्पर्धी गोलंदाजांचा आदर करावा लागतो. याचवेळी आपला नैसर्गिक खेळही साकारावा लागतो’, असे 63 कसोटी सामन्यात 4112 धावांचे योगदान देणाऱया या मुंबईकर फलंदाजाने नमूद केले.
‘ट्रेंट बोल्ट व वॅग्नर हे जलद गोलंदाज चेंडू आत आणण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे, क्रीझच्या बाहेर स्टान्स घेत स्विंगचा उत्तम मुकाबला करता येईल, असा रहाणेचा होरा आहे. गोलंदाजीचा सामना कसा करायचा, याबद्दल प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. काही फलंदाज स्विंगचा प्रभाव कमी करण्यासाठी क्रीझच्या बाहेर उभे राहतील तर काही फलंदाज क्रीझच्या अगदी आतही उभे राहतील. काही फलंदाज मधल्या स्टम्पवर तर काही लेगस्टम्पवर गार्ड घेतात. प्रत्येक खेळाडूने आपल्या मजबुतीला अनुसरुन रणनीती ठरवायला हवी’, असे रहाणे पुढे म्हणाला.
‘न्यूझीलंडमध्ये शरीराच्या जितक्या जवळून फटके मारता येईल, तितके जवळून मारावेत आणि आपल्या तंत्राबद्दल फारसा विचार करु नये. फटका शक्य तितका लवकर खेळायचा आहे, इतके स्वतःवर बिंबवणे महत्त्वाचे ठरेल. परिस्थितीनुसार, वेग व बाऊन्स वेगवेगळे असतील’, याचाही त्याने उल्लेख केला.
अजिंक्य रहाणे या बडय़ा कसोटी मालिकेच्या तयारीसाठी भारत अ संघाकडून न्यूझीलंड अ संघाविरुद्ध चार दिवसीय कसोटी सामनाही खेळणार असून या प्रयोगाचे त्याने स्वागत केले. ‘अ संघाचा दौरा याला ‘शॅडो टूर’ असे म्हणता येईल. कसोटी सामने खेळण्यापूर्वी भारत अ संघाचे सामने तेथे होत असतील तर ते उत्तम असेल. यामुळे, स्थानिक वातावरणाशी जुळवून घेता येईल, तसेच ‘मॅच प्रॅक्टिस’ही होईल. न्यूझीलंडमध्ये पोहोचल्यानंतर जेट लॅगचाही अधिक सामना करावा लागतो. एखाद्या दौऱयाची सुरुवात फक्त फटके घोटवून सरावाने होत नाही तर ती प्रवासाच्या दिवसापासूनच होते’, असे रहाणे पुढे म्हणाला.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरभ गांगुली व भारत अ संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यामुळे भारतीय क्रिकेट नव्या उंचीवर पोहोचेल, असा विश्वासही त्याने येथे व्यक्त केला. यापूर्वी 2014 मध्ये भारताने न्यूझीलंड दौरा केला, त्यावेळी संघातील बहुतांशी सदस्य नवे होते. पण, आता परिस्थिती बरीच बदलली आहे. त्यामुळे, ही मालिका रंगतदार होईल, असा रहाणेचा होरा आहे.
‘2014 मध्ये इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतर आम्ही एकत्रित चर्चा केली आणि नव्याने रणनीती आखली. चुका होऊ नयेत, यावर भर दिला आणि युवा पिढीसाठी नवा बेंचमार्क निश्चित करण्यावर जोर दिला’, असे त्याने शेवटी नमूद केले.
भारताच्या न्यूझीलंड दौऱयाची रुपरेषा
तारीख / लढत / भारतीय प्रमाणवेळ / ठिकाण
24 जानेवारी / पहिली टी-20 / दुपारी 12.30 वा. / ऑकलंड
26 जानेवारी / दुसरी टी-20 / दुपारी 12.30 वा. / ऑकलंड
29 जानेवारी / तिसरी टी-20 / दुपारी 12.30 वा. / हॅमिल्टन
31 जानेवारी / चौथी टी-20 / दुपारी 12.30 वा. / वेलिंग्टन
2 फेब्रुवारी / पाचवी टी-20 / दुपारी 12.30 वा. / माऊंट माऊनगनुई
5 फेब्रुवारी / पहिली वनडे (दिवस-रात्र)/ सकाळी 7.30 वा. / हॅमिल्टन
8 फेब्रुवारी / दुसरी वनडे / सकाळी 7.30 वा. (दिवस-रात्र) / ऑकलंड
11 फेब्रुवारी / तिसरी वनडे / सकाळी 7.30 वा. (दिवस-रात्र)/ माऊंट माऊनगनुई
21 ते 25 फेब्रुवारी / पहिली कसोटी / पहाटे 4 पासून / वेलिंग्टन
29 फेब्रुवारी ते 4 मार्च / दुसरी कसोटी / पहाटे 4 पासून / ख्राईस्टचर्च