भारत वि. न्यूझीलंड जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनल
केन विल्यम्सनसारखा तगडा कर्णधार आणि त्याच्या साथीला हेन्री निकोल्स, टॉम लॅथम, रॉस टेलर व बीजे वॅटलिंगसारखे अनुभवी सहकारी हे न्यूझीलंड संघाचे बलस्थान जरुर आहे. पण, विल्यम्सन व रॉस टेलर यांचा अपवाद वगळता बहुतांशी खेळाडूंना न्यूझीलंडबाहेर व त्यातही इंग्लिश भूमीत खेळण्याचा अनुभव नाही आणि ही बाब त्यांना फटका देणारी ठरु शकते का, हे पहावे लागेल. न्यूझीलंडची गोलंदाजी अर्थातच मजबूत आहे. पण, फलंदाजीत अनुभव व फॉर्मची कमतरता आहे. भारतीय संघ याचा कसा व किती लाभ घेणार, यावर या सामन्याची समीकरणे अवलंबून असणार आहेत.
केन विल्यम्सन सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक ः मागील हंगामात केन विल्यम्सनने सातत्याने धावांची आतषबाजी केली. भारताविरुद्ध 89 धावा फटकावल्या. 2 तडफदार द्विशतके झळकावली, शिवाय, विंडीज व पाकिस्तानविरुद्ध प्रत्येकी 1 शतक झळकावले. न्यूझीलंडचा हा कर्णधार परिस्थितीप्रमाणे आपल्या फलंदाजीत लवचिक बदल करत शेवटच्या चेंडूपर्यंत किल्ला लढवू शकतो. जागतिक स्तरावरील तो सर्वोत्तम फलंदाज नसला तरी सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक निश्चितच आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या 9 लढतीत त्याने 58.35 च्या सरासरीने 817 धावांची आतषबाजी केली आहे. कसोटी चॅम्पियनशिपमध्ये विल्यम्सनची सरासरी 58 इतकी आहे. मात्र, विदेशी भूमीत तो फारसा यशस्वी ठरलेला नाही.
हेन्री निकोल्सकडे इंग्लिश अनुभव नाहीः किवीज संघासाठी हेन्री निकोल्स हा या फायनलसाठी महत्त्वाचा खेळाडू असणार आहे. पण, आतापर्यंत हेन्रीने इंग्लिश भूमीत अगदी एकही कसोटी सामना खेळलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे.
रॉस टेलरच्या 469 धावा ः कर्णधार केन विल्यम्सन व रॉस टेलर या उभयतांचा अपवाद वगळता न्यूझीलंडच्या फलंदाजांना न्यूझीलंडबाहेर खेळण्याचा फारसा अनुभव नाही आणि ही बाब न्यूझीलंडला फटका देणारी ठरेल का, हे पहावे लागेल. रॉस टेलरने इंग्लंडमध्ये आतापर्यंत 7 कसोटी सामने खेळले असून यात त्याची कामगिरी उत्तम राहिली आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये त्याने 31.26 च्या सरासरीने 469 धावा काढल्या आहेत.
कॉलिन डे ग्रँडहोम वर्षभरापासून मैदानाबाहेर ः न्यूझीलंडच्या या अष्टपैलू खेळाडूला दुखापतीचा सातत्याने फटका बसत आला आहे. मार्चमध्ये त्याला उजव्या गुडघ्याची दुखापत झाली आणि त्यापूर्वी वर्षभर तो दुखापतीमुळे संघाबाहेर राहिला. 34 वर्षीय ग्रँडहोमला काही स्थानिक स्पर्धांमध्ये फक्त स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून खेळणे भाग पडले होते. न्यूझीलंडचा संघ इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामने खेळणार असून त्या लढतीतील प्रदर्शनाच्या आधारे भारताविरुद्ध कसोटी चॅम्पियनशिप फायनलसाठी निवड होऊ शकते. त्यामुळे, या 2 कसोटीतील फॉर्म महत्त्वाचा ठरु शकतो.
विल यंगकडे 2 कसोटींचा अनुभव ः या युवा फलंदाजाने डिसेंबर 2020 मध्ये विंडीजविरुद्ध 2 कसोटी सामने खेळले आहेत. ख्राईस्टचर्चमध्ये बांगलादेशविरुद्ध लढतीत कसोटी पदार्पणाची संधी त्याला होती. पण, तो सामना दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रद्द केला गेला होता.
डॅरेल मिशेलची सरासरी लक्षवेधी ः 30 वर्षीय डॅरेल मिशेलकडेही फक्त 4 कसोटी सामन्यांचा अनुभव असून यात त्याने 75.33 च्या सरासरीने 226 धावा फटकावल्या आहेत. याच महिन्यात त्याचा न्यूझीलंडच्या मध्यवर्ती करारश्रेणीत समावेश केला गेला आहे.
सॅन्टनरसाठी इंग्लंडविरुद्ध मालिका महत्त्वाची ः 29 वर्षीय मिशेल सॅन्टनरला इंग्लंडविरुद्ध मालिकेत एजाझ पटेलऐवजी संधी दिली जाईल, हे जवळपास निश्चित आहे. सॅन्टनरने या संधीचा लाभ घेतला तर त्याला भारताविरुद्ध आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये देखील खेळवले जाईल. 2015 मध्ये डॅनिएल व्हेटोरी निवृत्त झाल्यानंतर सॅन्टनरला किवीज संघात स्थान मिळाले. सॅन्टनर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सातत्याने खेळत आला आहे. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये त्याला जम बसवता आलेला नाही. काही वेळा दुखापतींचा फटकाही त्याला सोसावा लागला आहे. आतापर्यंत खेळलेल्या 23 कसोटी सामन्यात त्याने 41 बळी घेतले व 766 धावाही जमवल्या आहेत.
टॉम ब्लंडेलला खरी संधी फायनलनंतरच ः न्यूझीलंडचा विद्यमान यष्टीरक्षक बीजे वॅटलिंगने भारताविरुद्ध कसोटी चॅम्पियनशिप फायनलनंतर आपण निवृत्त होणार असल्याची घोषणा यापूर्वी केली आहे. त्यामुळे, ब्लंडेलला या लढतीत संधी मिळण्याची शक्यता तूर्तास कमी आहे. पण, ज्या वॅटलिंगकडे तो रोल मॉडेल म्हणून पाहतो, त्याच वॅटलिंगची संघात उणीव जाणवू नये, यासाठी ब्लंडेलला या मालिकेनंतर प्रयत्नशील असावे लागणार आहे. 30 वर्षीय ब्लंडेलने आतापर्यंत किवीज संघातर्फे 10 कसोटी सामने खेळले आहेत.
टॉम लॅथमकडे 2 कसोटींचा अनुभव ः टॉम लॅथम जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेत आतापर्यंत केन विल्यम्सनपाठोपाठ दुसऱया क्रमांकाच्या धावा जमवण्यात यशस्वी ठरला आहे. डावखुऱया लॅथमने जवळपास पूर्ण कारकिर्दीत सलामीलाच फलंदाजी केली आहे. तो 95 डावात सलामीला आला तर केवळ दोनवेळा चौथ्या स्थानी उतरला. किवीज फलंदाजी लाईनअपमध्ये लॅथम किवीज संघासाठी महत्त्वाचा फलंदाज ठरला आहे. मात्र, इंग्लंडमध्ये या अव्वल फलंदाजाने आजवर केवळ दोनच कसोटी सामने खेळले आहेत.
बीजे वॅटलिंगसाठी शेवटचे प्रतिनिधीत्व ः न्यूझीलंडचा अनुभवी यष्टीरक्षक बीजे वॅटलिंगने भारताविरुद्ध फायनल ही आपल्या कारकिर्दीतील शेवटची लढत असेल, असे यापूर्वीच म्हटले आहे. त्यामुळे, येथे विजयी सांगता करण्याचा त्याचा प्रयत्न असेल. या यष्टीरक्षक-फलंदाजाने न्यूझीलंडतर्फे आतापर्यंत 73 कसोटी सामने खेळले आहेत. वॅटलिंगने 2009 मध्ये कसोटी पदार्पण केले होते.
ट्रेंट बोल्ट हुकमी गोलंदाज ः न्यूझीलंडच्या या जलद गोलंदाजाची जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधील सरासरी इशांत शर्मा, मोहम्मद शमी, नील वॅग्नर व टीम साऊदी यांच्यापेक्षाही खराब आहे. पण, डावखुरी गोलंदाजी आणि त्यातही स्विंग गोलंदाजीत स्पेशालिस्ट, ही बोल्टची खासियत यातील कोणत्याच गोलंदाजाकडे नाही. बोल्ट मागील अनेक वर्षांपासून न्यूझीलंडचा हुकमी गोलंदाज ठरत आला आहे आणि यंदाची आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप देखील याला अपवाद नसेल. जगातील खूपच कमी डावखुरे गोलंदाज उजव्या हाताच्या फलंदाजांना इनस्विंगर्स टाकू शकतात आणि बोल्टचा यात प्राधान्याने समावेश आहे.
डग ब्रेसवेल ः 27 सामन्यात 72 बळी घेणाऱया डग ब्रेसवेलकडून न्यूझीलंड संघाला बऱयाच अपेक्षा असणार आहेत. ट्रेंट बोल्ट इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत खेळणार नाही. त्यामुळे, ब्रेसवेलवर अधिक जबाबदारी असणार आहे. इंग्लंडमध्ये चेंडू उत्तम स्विंग होतो. त्यामुळे, ब्रेसवेल येथे भरीव योगदान देण्याची क्षमता राखून असेल.
मॅट हेन्री ः 29 वर्षीय जलद गोलंदाज मॅट हेन्री हा न्यूझीलंडच्या ताफ्यातील आणखी एक महत्त्वाचा खेळाडू. हेन्रीकडे 13 कसोटी सामन्यांचा अनुभव असून यात त्याला 31 बळी घेता आले आहेत. इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजीला पोषक वातावरणात त्याची गोलंदाजी बहरु शकते.
काईल जेमिसन ः न्यूझीलंडच्या कसोटी इतिहासातील सर्वात उंच गोलंदाज म्हणून ख्याती असलेल्या काईल जेमिसनकडून किवीज संघाला बऱयाच अपेक्षा आहेत. पहिल्या 6 कसोटीत 13.27 च्या सरासरीने 36 बळी गारद करणाऱया काईल जेमिसनने आपल्या कारकिर्दीला तडाखेबंद सुरुवात केली आहे. तळाच्या क्रमवारीत फलंदाजीला उतरणाऱया जेमिसनची फलंदाजीही उत्तम आहे. आश्चर्य वाटेल, पण, कसोटी क्रिकेटमध्ये त्याची आतापर्यंतची सरासरी 56.50 इतकी आहे!फर्स्ट चेंज आणि सेकंड चेंज म्हणून त्याने भेदक मारा केला आहे. नव्या चेंडूवर तो तितका प्रभावी ठरेल का, हे अद्याप अनिश्चित आहे. याशिवाय, इंग्लंडमध्ये तो प्रथमच कसोटी क्रिकेट खेळणार आहे.
डफी, एजाझ, रचिन रविंद्र, कॉनव्हे ः रचिन रविंद्रचे पालक भारतीय आहेत. रविंद्र फलंदाज अष्टपैलू असून त्याने आजवर 26 प्रथमश्रेणी सामने खेळले. न्यूझीलंड अ संघाकडून प्रभावी खेळ साकारल्यानंतर त्याला वरिष्ठ संघात स्थान मिळाले. जेकब डफीने पाकिस्तानविरुद्ध टी-20 पदार्पण केले असून या उभयतांना कसोटी पदार्पणाची प्रतीक्षा आहे. नवोदित डेव्हॉन कॉनव्हे देखील कसोटी पदार्पणाच्या प्रतीक्षेत आहे. याशिवाय, एजाझ पटेलने आतापर्यंत 8 कसोटी सामने खेळले आहेत.
टीम साऊदी व नील वॅग्नर ः जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलपूर्वी न्यूझीलंडचा संघ इंग्लंडविरुद्ध 2 कसोटी सामने खेळणार असला तरी या सामन्यांकडे फायनलपूर्वीचे वॉर्मअप असे पाहता येणार नाही, असे टीम साऊदी व नील वॅग्नर या अनुभवी गोलंदाजांना वाटते. इंग्लंडमधील वातावरण नेहमी आव्हानात्मक असते. त्यामुळे, प्रत्येक वेळी तेथे स्वतंत्र तयारी करावी लागते, असे या उभयतांचे मत आहे. 32 वर्षीय टीम साऊदीकडे 77 कसोटी तर वॅग्नरकडे 51 कसोटी सामन्यांचा अनुभव आहे.