पाकला 373 धावांचेलक्ष्य,दिवसअखेर 3 बाद 71
वृत्तसंस्था/ माऊंट माँगनुई
येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत यजमान न्यूझीलंड संघाने विजयाच्या दिशेने वाटचाल केली असून चौथ्या दिवशीअखेर पाकने दुसऱया डावात 3 बाद 71 धावा जमविल्या होत्या. पाकला विजयासाठी अद्याप 302 धावांची गरज आहे.
या सामन्यात न्यूझीलंडने पहिल्या डावात 431 धावा जमविल्यानंतर पाकिस्तानने 239 धावा जमवित फॉलोऑन टाळला होता. त्यानंतर न्यूझीलंडने 45.3 षटकांत 5 बाद 180 धावांवर दुसरा डाव घोषित करून पाकला विजयासाठी 373 धावांचे आव्हान दिले. न्यूझीलंडच्या दुसऱया डावात टॉम लॅथम (53) व टॉम ब्लंडेल (64) यांनी अर्धशतके नोंदवत 111 धावांची भक्कम सलामी दिली. पण त्यानंतर जलद धावा जमविण्याच्या नादात कर्णधार केन विल्यम्सन 21, हेन्री निकोल्स 11, वॅटलिंग 5 धावा काढून बाद झाले. टेलर 12 व सँटनर 6 धावांवर नाबाद राहिले. पाकच्या नसीम शहाने 55 धावांत 3 बळी मिळविले तर मोहम्मद अब्बासने एक बळी मिळविला.
पाकच्या दुसऱया डावाची सुरुवात मात्र निराशाजनक झाली. दुसऱया षटकातील दुसऱयाच चेंडूवर अबिद अली शून्यावर बाद झाला आणि तिसऱया षटकातील दुसऱया चेंडूवर शान मसूदही बाद झाल्याने त्यांची स्थिती 2 बाद 0 अशी झाली. अझहर अली व हॅरिस सोहेल यांनी ही पडझड थोडीफार रोखली होती. पण सोहेलही वैयक्तिक 9 धावांवर बाद झाल्यानंतर 3 बाद 37 अशी पाकची स्थिती झाली. अझहरला फवाद आलमकडून चांगली साथ मिळाल्याने उर्वरित षटके आणखी पडझड होऊ न देता त्यांनी खेळू काढली. 38 षटकाअखेर पाकने 3 बाद 71 धावांपर्यंत मजल मारली असून अझहर अली 34, आलम 21 धावांवर खेळत होते. बोल्टने अबिद अलीला बाद केले तर साऊदीने मसूद व सोहेल यांचे बळी मिळविले. पाकला अद्याप 302 धावांची जरूरी असून न्यूझीलंडला शेवटच्या दिवशी विजयासाठी सात बळींची गरज आहे.
संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड प.डाव 431, पाक प.डाव 239, न्यूझीलंड दु.डाव 5 बाद 180 डाव घोषित : लॅथम 53, ब्लंडेल 64, विल्यम्सन 21, टेलर नाबाद 12, निकोल्स 11, वॅटलिंग 5, सँटनर नाबाद 6, अवांतर 8. गोलंदाजी : नसीम शहा 3-55, मोहम्मद अब्बास 1-33. पाक दुसरा डाव 38 षटकांत 3 बाद 71 : शान मसूद 0, अबिद अली 0, अझहर अली खेळत आहे 34, सोहेल 9, फवाद आलम खेळत आहे 21, अवांतर 7. गोलंदाजी : साऊदी 2-15, बोल्ट 1-24.