रांचीत उभय संघात आज दुसरी टी-20, मध्यफळीतील फलंदाजांकडून सरस प्रदर्शन अपेक्षित, दुखापतीमुळे मोहम्मद सिराजच्या उपलब्धतेविषयी साशंकता
वृत्तसंस्था /रांची
नवे प्रशिक्षक राहुल द्रविड व कर्णधार रोहित शर्मा यांच्या मार्गदर्शनाखालील भारतीय क्रिकेट संघ आज (शुक्रवार दि. 19) न्यूझीलंडविरुद्ध दुसऱया टी-20 सामन्यासाठी मैदानात उतरेल, त्यावेळी त्यांच्यासमोर मालिकाविजयावर शिक्कामोर्तब करण्याचे मुख्य लक्ष्य असेल. मधल्या फळीतील फलंदाजांकडून भारताला येथे सरस प्रदर्शनाची अपेक्षा असणार आहे. सायंकाळी 7 वाजता या लढतीला प्रारंभ होईल.
नेहमीच कर्दनकाळ ठरत आलेल्या किवीज संघाला पहिल्या टी-20 सामन्यात धूळ चारत द्रविड-रोहित यांनी आपल्या पर्वाला दमदार सुरुवात केली. तीच घोडदौड येथेही कायम राखण्याची त्यांच्याकडून अपेक्षा असेल.
रोहित शर्मा आजच्या दुसऱया लढतीनंतर अडीच आठवडय़ांच्या ब्रेकवर जाणार असून त्यापूर्वी टी-20 मालिकाविजयावर शिक्कामोर्तब करुन देण्याचा त्याचा प्रयत्न असणार आहे. विराट कोहलीच्या गैरहजेरीत तिसऱया स्थानी फलंदाजीला उतरण्याची नामी संधी मिळालेल्या सुर्यकुमार यादवने याचा पुरेपूर लाभ घेत 40 चेंडूत 62 धावांची दमदार खेळी साकारली होती.
श्रेयस अय्यर व रिषभ पंत यांचा खराब फॉर्म चिंतेचा ठरला असला तरी येथे ते मुसंडी मारणार का, हे पहावे लागेल. श्रेयस अय्यर प्रदीर्घ कालावधीनंतर भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करत असून पहिल्या सामन्यात तो सहजतेने स्ट्राईक रोटेट करु शकला नव्हता. टीम साऊदीच्या गोलंदाजीवर अय्यर 8 चेंडूत 5 धावांवर बाद झाला. मात्र, सरस धावगतीमुळे भारताच्या वाटचालीवर याचा विपरित परिणाम झाला नाही. सवाई मानसिंग स्टेडियमवरील या लढतीत सुर्यकुमार यादवची फलंदाजी मात्र लक्षवेधी ठरली.
अश्विन-भुवनेश्वरमुळे दिलासा
वरिष्ठ गोलंदाज भुवनेश्वर कुमार व रविचंद्रन अश्विनला सूर सापडल्याने भारतीय संघाला दिलासा मिळाला. दुसरीकडे, अन्य अननुभवी गोलंदाजांना मात्र बऱयाच धावा मोजाव्या लागल्या. यापूर्वी टी-20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यानंतर भुवनेश्वरला संघातील जागा गमवावी लागली होती. मात्र, येथे रोहित-राहुल द्रविड यांच्या नव्या व्यवस्थापनाने त्याला आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला. 31 वर्षीय भुवनेश्वर सध्या आपल्या कारकिर्दीतील सर्वात कठीण कालखंडातून जात असून सनरायजर्स हैदराबादतर्फे त्याला 6 सामन्यात 54 च्या सरासरीने केवळ 3 गडी बाद करता आले होते. येथे मात्र एका अप्रतिम इनस्विंगरवर डॅरेल मिशेलचा त्रिफळा उडवत त्याने लक्षवेधी सुरुवात केली. या लढतीत त्याने 24 धावात 2 बळी घेतले तर अश्विननेही 23 धावात 2 बळी, असा लक्षवेधी मारा साकारला.
नाणेफेक पुन्हा महत्त्वाची
आजची लढतही सायंकाळच्या सत्रात होणार असून डय़ू फॅक्टरमुळे नाणेफेक पुन्हा एकदा महत्त्वाची ठरेल, अशी शक्यता आहे. मध्यमगती गोलंदाज मोहम्मद सिराज पहिल्या लढतीत दुखापतग्रस्त झाल्याने आजच्या सामन्यात भारतीय संघाला किमान एक बदल करावाच लागेल, असे जवळपास स्पष्ट आहे. न्यूझीलंडला नाणेफेक गमवावी लागल्याची मोठी किंमत अदा करावी लागली. मात्र, मार्क चॅपमन बहरात परतला, ही त्यांच्यासाठी दिलासा देणारी बाब ठरली.
द्रविडने प्रशिक्षकपद स्वीकारणे आश्चर्याचे : रिकी पाँटिंग
राहुल द्रविडने राष्ट्रीय प्रशिक्षकपद स्वीकारले, याचे मला आश्चर्य वाटते, अशी प्रतिक्रिया माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटिंगने व्यक्त केली. द्रविड यू-19 संघाच्या प्रशिक्षकपदात अधिक समाधानी आहे आणि मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारण्यात त्याला फारसे स्वारस्य नाही, असेच मी ऐकले होते. मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर कुटुंबाला फारसा वेळ देता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे, द्रविड राजी होईल, असे वाटत नव्हते. पण, त्याने ही जबाबदारी स्वीकारली आणि बहुतांशी घटकांनी या निवडीचे स्वागत केले, इतके मला तूर्तास ज्ञात आहे, याचा पाँटिंगने येथे उल्लेख केला.
सुर्यकुमार म्हणतो, पहिल्या क्रमांकापासून सातव्या क्रमांकापर्यंत कुठेही खेळेन!
आयपीएल प्रँचायझी मुंबई इंडियन्सकडून मी तिसऱया स्थानी उतरत आलो असून यामुळे मला त्याचा सराव आहे. मात्र, पुढील टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर विचार करता कोणत्याही स्थानी फलंदाजीची माझी तयारी आहे. माझी फलंदाजी शैली कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेण्याइतकी लवचिक आहे, असे सुर्यकुमार यादव म्हणाला. अनुभवी विराट कोहलीच्या गैरहजेरीत तिसऱया स्थानी उतरणाऱया या युवा फलंदाजाने अतिशय लक्षवेधी फलंदाजी साकारली.
मी पहिल्या क्रमांकापासून सातव्या क्रमांकापर्यंत प्रत्येक जागी फलंदाजी केली आहे. मुंबई इंडियन्सतर्फे मागील 3 वर्षे मी तिसऱया स्थानी फलंदाजीला उतरलो. कोणत्याही स्थानी फलंदाजीला उतरलो तरी माझे फटके तेच असतात, ते बदलत नाहीत, असे हा दिग्गज फलंदाज याप्रसंगी म्हणाला.
द्रविड यांच्या प्रशिक्षण शैलीवर आताच काही टिपणी करणे अतिशय घाईचे ठरेल. पण, त्यांच्यामुळे ड्रेसिंगरुममध्ये खुशीची लहर परतेल, अशी आम्हा खेळाडूंची अपेक्षा आहे. यू-19 स्तरावर त्यांनी घेतलेली मेहनत त्यांच्या समर्पित वृत्तीचा दाखला देते.
-आघाडीचा भारतीय फिरकीपटू रविचंद्रन अश्विन
गोलंदाजीत प्रचंड वैविध्य आणणाऱया अनुभवी रविचंद्रन अश्विनला सामोरे जाणे नेहमीच आव्हानात्मक असते. त्याची लाईन अँड लेंग्थवर कमालीची हुकूमत आहे. मात्र, पहिल्या सामन्यात आम्ही आणखी 10 धावा जमवले असते तर चित्र वेगळे दिसले असते.
-न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टील
प्रतिस्पर्धी संघ
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन, वेंकटेश अय्यर, यजुवेंद्र चहल, आर. अश्विन, अक्षर पटेल, अवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड : टीम साऊदी (कर्णधार), टॉड ऍस्ले, ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गप्टील, ऍडम मिल्ने, डॅरेल मिशेल, जिम्मी नीशम, ग्लेन फिलीप्स, मिशेल सॅन्टनर, टीम सेफर्ट, ईश सोधी.
सामन्याची वेळ : सायं. 7 वा.
प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क