वृत्तसंस्था/ लिनक्वॉईन
शुक्रवारपासून येथे सुरू झालेल्या दुसऱया अनाधिकृत कसोटीत खेळाच्या पहिल्या दिवसाअखेर यजमान न्यूझीलंड अ संघाने पहिल्या डावात 5 बाद 276 धावा जमविल्या. ग्लेन फिलीप्सने शानदार अर्धशतक झळकविले.
उभय संघातील यापूर्वी झालेली पहिली अनाधिकृत कसोटी अनिर्णित राहिली होती. या दुसऱया कसोटीत न्यूझीलंड अ ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रूदरफोर्ड आणि यंग या सलामीच्या जोडीने 67 धावांची भागिदारी करून संघाच्या डावाला चांगली सुरूवात करून दिली. भारत अ संघातील मोहम्मद सिराजने कर्णधार रूदरफोर्डला झेलबाद केले. त्याने 79 चेंडूत 40 धावा जमविल्या. त्यानंतर न्यूझीलंड अ संघातील रविंद्रने 3 चौकारासह 9 चेंडूत 12 धावा जमवित सिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. फिलीप्स आणि यंग या जोडीने संघाचा डाव सावरला. फिरकी गोलंदाज नदीमने यंगला झेलबाद केले. त्याने 101 चेंडूत 26 धावा जमविल्या. फिलीप्स आणि सिफर्ट या जोडीने चौथ्या गडय़ासाठी 76 धावांची भर घातली. आवेश खानने न्यूझीलंड अ संघाचे दोन फलंदाज झटपट बाद केले. त्यामुळे त्यांची 57 षटकाअखेर स्थिती 5 बाद 190 अशी झाली. आवेश खानने फिलीप्स आणि सिफर्ट यांचे बळी मिळविले. फिलीप्सने 1 षटकार आणि 9 चौकारासह 80 चेंडूत 65 धावा जमविल्या. क्लेव्हर आणि मिचेल यानी सहाव्या गडय़ासाठी अभेद्य 86 धावांची भागिदारी केली आहे. क्लेव्हर 5 चौकारासह 115 चेंडूत 46 धावावर तर मिचेल 3 चौकार आणि 1 षटकारासह 36 धावावर खेळत आहेत. भारत अ संघातर्फे आवेश खानने 57 धावात 2, मोहम्मद सिराजने 58 धावात 2 तर नदीमने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक- न्यूझीलंड अ प डाव 90 षटकात 5 बाद 276 (फिलीप्स 65, रूदरफोर्ट 40, यंग 26, मिचेल खेळत आहे 36, क्लेव्हर खेळत आहे 46,सिफर्ट 30, आवेश खान 2-57, मोहम्मद सिराज 2-58, नदीम 1 बळी).