ऑनलाईन टीम / वेलिंगटन :
संपूर्ण जगात कोरोना व्हायरस थैमान घालत असतानाच न्यूझीलंडमधून एक चांगली बातमी समोर आली आहे. न्यूझीलंडमध्ये कोरोनाची लागण झालेल्या अंतिम रुग्णाची देखील प्रकृती सुधारली असून त्याला घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डन यांनी सोमवारी दिली.
न्यूझीलंडमध्ये कोरोना संसर्गचा अंतिम रुग्ण 17 दिवसांपूर्वी समोर आला होता आणि फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यानंतर आजचा सोमवार असा आला आहे की, या दिवशी देशातील कोणत्याही व्यक्तीवर कोरोनाचा उपचार सुरू नाही.
याबाबत अधिक माहिती देताना अर्डन म्हणाल्या की, न्यूझीलंडमध्ये मागील 17 दिवसात 40 हजार लोकांची टेस्ट करण्यात आली. तर मागील 12 दिवसात एकही रुग्ण रुग्णालयात नाही. पुढे त्या म्हणाल्या, मंत्रिमंडळाने काल मध्यरात्रीपासून संपूर्ण देश दुसऱ्या टप्प्यात सुरू करण्यास परवानगी दिली आहे. आम्हाला विश्वास आहे की सध्याच्या स्थितीला आम्ही न्यूझीलंडमध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यास यशस्वी झालो आहोत. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही इथेच थांबणार आहोत, तर या दिशेने आमचे प्रयत्न सुरूच राहणार आहेत.
निश्चितपणे यापुढे ही पुन्हा कोरोनाचे रुग्ण समोर येण्याची शक्यता आहे. पण हे आमचे अपयश नसून एक वास्तव आहे. पण या परिस्थतीचा सामना करण्यास आम्ही पूर्णपणे तयार आहोत. आमच्या इथे कोरोनाची स्थिती फार गंभीर नाही. आता पर्यंत आमच्या देशात 1500 जणांना कोरोनाची लागण झाली होती. तर कोरोना मुळे 22 जणांचा मृत्यू झाला होता. यापुढे ही या महामारीला दूर ठेवण्यास आमचे प्रयत्न सुरूच राहतील.