भारताची किवीज संघावर 6 गडी राखून मात, केएल राहुल, श्रेयस अय्यर, विराटची फटकेबाजी निर्णायक
ऑकलंड / वृत्तसंस्था
गुणवत्ता ठासून भारलेल्या श्रेयस अय्यरने फिनिशरच्या भूमिकेत आपण चपखल बसतो, हे 29 चेंडूत 58 धावांच्या खेळीसह दाखवून दिल्यानंतर भारताने येथील पहिल्या टी-20 लढतीत यजमान न्यूझीलंडला 6 गडी राखून मात दिली आणि 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी विजयी आघाडी घेतली. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर निर्धारित 20 षटकात 5 बाद 203 धावांचा डोंगर जरुर रचला. पण, प्रत्युत्तरात भारताने 19 षटकात 4 गडय़ांच्या बदल्यातच विजयाचे लक्ष्य गाठले.
विजयासाठी 204 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघातर्फे केएल राहुल (27 चेंडूत 56), सामनावीर श्रेयस अय्यर (29 चेंडूत 58) व विराट कोहली (32 चेंडूत 45) यांनी फटकेबाजी करत विजय खेचून आणला. तत्पूर्वी, इर्डन पार्कच्या येथील छोटय़ा मैदानावर न्यूझीलंडला आणखी फटकेबाजीपासून रोखण्यात भारतीय गोलंदाजांचा वाटा तितकाच महत्त्वाचा होता. किवीज संघाच्या द्विशतकी वाटचालीत कॉलिन मुन्रो, केन विल्यम्सनच्या अर्धशतकांचा वाटा मोठा राहिला.
रोहित स्वस्तात बाद
204 धावांना प्रत्युत्तर देताना रोहित शर्मा (7) दुसऱयाच षटकात बाद झाला. मिशेल सॅन्टनरच्या गोलंदाजीवर तुटून पडण्याच्या प्रयत्नात त्याने आपली विकेट गमावली. पण, त्यानंतर केएल राहुल व विराट कोहली यांनी दुसऱया गडय़ासाठी अवघ्या 47 चेंडूतच 80 धावा झोडपल्या. या उभयतांनी 7 चौकार व 4 षटकारांची आतषबाजी करत किवीज गोलंदाजांना त्यांच्या मर्यादा दाखवून दिल्या.
या दोघांच्या तुफानी फटकेबाजीमुळे 9 व्या षटकातच 100 धावांची बरसात केली होती. राहुल एकाच चेंडूवर दोन वेळा धावचीत होता होता बचावल्याने चांगलाच सुदैवी ठरला. याशिवाय, ईश सोधीने कोहलीला एक जीवदान दिले.
केएल राहुलचा फॉर्म कायम
केएल राहुलने आपला बहारदार फॉर्म कायम राखत 23 चेंडूतच अर्धशतक साजरे केले तर कोहलीचे अर्धशतक 5 धावांनी हुकले. यजमान संघाने नंतर राहुल व कोहली यांना लागोपाठ बाद करत सामन्यात परतण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. राहुल 10 व्या षटकात सोधीच्या गोलंदाजीवर झेल देत परतला तर त्यानंतर सात चेंडूंच्या अंतराने मार्टिन गप्टीलने डीप मिडविकेटवर अप्रतिम झेल टिपत कोहलीची खेळी संपुष्टात आणली.
बढतीवर फलंदाजीला आलेल्या शिवम दुबेला 13 अय्यरच्या साथीने केवळ 21 धावा जोडता आल्या. दुबे सोधीचा दुसरा बळी ठरला. त्यानंतर मात्र अय्यरने किवीज गोलंदाजांवर तुफानी हल्ला चढवत मनीष पांडेसमवेत 29 चेंडूत 50 धावांची आतषबाजी केली. मनीष पांडे 12 चेंडूत एका षटकारासह 14 धावांवर नाबाद राहिला. अय्यरने डीप मिडविकेटला शानदार षटकार खेचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
मुन्रो, विल्यम्सनची फटकेबाजी
कॉलिन मुन्रो, विल्यम्सन व रॉस टेलर यांची फटकेबाजी हे न्यूझीलंडच्या डावाचे ठळक वैशिष्टय़ ठरले. जसप्रित बुमराहने (1-31) गोलंदाजीत उत्तम बदल करत किवीज फलंदाजांवर लगाम लावला आणि यजुवेंद्र चहल (4 षटकात 1-32), रविंद्र जडेजा (2 षटकात 1-18) या फिरकीपटूंनीही त्यात मोलाचे योगदान दिले. कॉलिन मुन्रोने 42 चेंडूत 6 चौकार, 2 षटकारांसह 59 तर विल्यम्सनने 26 चेंडूत 4 चौकार, 4 षटकारांसह 51 धावांची रास ओतली. मुन्रो व गप्टील (19 चेंडूत 30) यांनी पॉवर प्लेच्या 6 षटकात 68 धावांची अभेद्य भागीदारी साकारली. शार्दुल ठाकुर (1-44), मोहम्मद शमी (0-53) पहिल्या स्पेलमध्ये बरेच महागडे ठरले. त्यामुळे, भारताला पहिल्या 8 षटकातच 6 गोलंदाज वापरावे लागले.
दुबेने गप्टीलला रोहितकरवी झेलबाद केले आणि ही जोडी फोडली गेली. मुन्रोने 36 चेंडूत अर्धशतक साजरे केल्यानंतर शार्दुलच्या गोलंदाजीवर तंबूचा रस्ता धरला. रविंद्र जडेजाने कॉलिन डे ग्रँडहोमला शून्यावर बाद केले. किवीज संघाने 13 षटकात 117 धावा केल्या. नंतर विल्यम्सन, टेलर यांच्या फटकेबाजीमुळे त्यांनी द्विशतकी मजल मारली. टेलरने 25 चेंडूतच अर्धशतक साजरे करताना शमीच्या डावातील 16 व्या षटकात चक्क 22 धावा लुटल्या. अर्थात, 6 वर्षातील त्याचे हे पहिलेच अर्धशतक ठरले. केएल राहुलचे उत्तम यष्टीरक्षण देखील भारतासाठी विशेष दिलासा देणारे ठरले.
धावफलक
न्यूझीलंड : मार्टिन गप्टील झे. शर्मा, गो. दुबे 30 (19 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), कॉलिन मुन्रो झे. चहल, गो. शार्दुल 59 (42 चेंडूत 6 चौकार, 2 षटकार), केन विल्यम्सन झे. कोहली, गो. चहल 51 (26 चेंडूत 4 चौकार, 4 षटकार), कॉलिन डे ग्रँडहोम झे. दुबे, गो. जडेजा 0 (2 चेंडू), रॉस टेलर नाबाद 54 (27 चेंडूत 3 चौकार, 3 षटकार), सेफर्ट झे. अय्यर, गो. बुमराह 1 (2 चेंडू), मिशेल सॅन्टनर नाबाद 2 (2 चेंडू). अवांतर 6. एकूण 20 षटकात 5 बाद 203.
गडी बाद होण्याचा क्रम
1-80 (गप्टील, 7.5), 2-116 (मुन्रो, 11.5), 3-117 (ग्रँडहोम, 12.2), 4-178 (विल्यम्सन, 16.6), 5-181 (सेफर्ट, 17.5).
गोलंदाजी
जसप्रित बुमराह 4-0-31-1, शार्दुल ठाकुर 3-0-44-1, मोहम्मद शमी 4-0-53-0, यजुवेंद्र चहल 4-0-32-1, शिवम दुबे 3-0-24-1, रविंद्र जडेजा 2-0-18-1.
भारत : रोहित शर्मा झे. टेलर, गो. सॅन्टनर 7 (6 चेंडूत 1 षटकार), केएल राहुल झे. साऊदी, गो. सोधी 56 (27 चेंडूत 4 चौकार, 3 षटकार), विराट कोहली झे. गप्टील, गो. टिकनर 45 (32 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), श्रेयस अय्यर नाबाद 58 (29 चेंडूत 5 चौकार, 3 षटकार), शिवम दुबे झे. साऊदी, गो. सोधी 13 (9 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), मनीष पांडे नाबाद 14 (12 चेंडूत 1 षटकार). अवांतर 11. एकूण 19 षटकात 4 बाद 204.
गडी बाद होण्याचा क्रम
1-16 (रोहित, 1.4), 2-115 (केएल राहुल, 9.6), 3-121 (विराट, 11.1), 4-142 (शिवम दुबे, 13.2).
गोलंदाजी
टीम साऊदी 4-0-48-0, मिशेल सॅन्टनर 4-0-50-1, हमिश बेनेट 4-0-36-0, ब्लेयर टिकनर 3-0-34-1, ईश सोधी 4-0-36-2.
षटकनिहाय धावसंख्या
संघ / 5 षटके / 10 षटके / 15 षटके / 20 षटके
न्यूझीलंड / 0-52 / 1-91 / 3-143 / 5-203
भारत / 1-57 / 2-115 / 4-151 / 4-204 (19)
प्रचंड मोठा गोंधळ…….फिर भी बच गये!
डावातील सहाव्या षटकात बेनेट गोलंदाजीवर असताना केएल राहुल एकाच चेंडूत चक्क दोनवेळा बाद होता होता वाचला. राहुलने स्लोअर वन चेंडू कव्हरकडे फटकावल्यानंतर त्याचे पूर्ण लक्ष चेंडूकडे होते. धाव घेण्याचा त्याचा इरादा नव्हताच. पण, तोवर विराट कोहली निम्मे अंतर धावून आला होता. केएल राहुल खेळपट्टीपासून बराच दूर असताना साऊदीला नॉन स्ट्रायकर एण्डवर थेट थ्रो करता आला नाही आणि मिडऑनवरुन पुन्हा झालेला थ्रोही बराच बाहेर राहिला. इतका अवधी पुरेसा ठरल्यानंतर केएल राहुल कसाबसा क्रीझमध्ये पोहोचला. रनिंग बिटविन द विकेटमध्ये इतका प्रचंड गोंधळ होऊन देखील बचावल्याने केएल राहुलसह विराटसाठी देखील हा सुखद धक्का ठरला आणि अर्थातच, भारतीय गोटात एकच प्रतिक्रिया उमटली….फिर भी बच गये!