बेंगळूर / वृत्तसंस्था
आगामी न्यूझीलंड दौऱयासाठी वनडे व कसोटी संघनिवड आज केली जाणार असून यात केएल राहुलला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे संधी मिळेल, असे संकेत आहेत. याशिवाय, अष्टपैलू हार्दिक पंडय़ाच्या तंदुरुस्तीविषयी चर्चा अपेक्षित आहे. राहुल हा टी-20 व वनडे क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण खेळाडू ठरला. पण, ऑस्ट्रेलिया दौऱयानंतर त्याला कसोटी संघातील स्थान गमवावे लागले होते.
कर्णधार विराट कोहलीने मात्र राहुलसारख्या खेळाडूला वगळणे कठीण असल्याचे मत मांडले असून यामुळे पृथ्वी शॉ किंवा शुभमन गिल यांच्यापेक्षा त्याला अधिक संधी असल्याचे मानले जाते.
याशिवाय, वेगाने प्रगतीपथावर असलेल्या नवदीप सैनीला अतिरिक्त जलद गोलंदाज म्हणून संधी मिळू शकेल, असा अंदाज आहे. अश्विन व जडेजा यांच्यापैकी एकच गोलंदाज अंतिम संघात असेल, त्यामुळे तिसरा फिरकीपटू कुलदीप यादवविषयी देखील साशंकता असेल. भारतीय संघव्यवस्थापन हार्दिक पंडय़ा पूर्ण तंदुरुस्त होण्याच्या प्रतीक्षेत असून तो उपलब्ध झाल्यानंतर वनडे संघात त्याची निवड जवळपास निश्चित असेल. पंडय़ा यापूर्वी अ दौऱयासाठी आपली तंदुरुस्ती सिद्ध करु शकलेला नाही. पंडय़ा तंदुरुस्त नसेल तर निवडकर्ते सुर्यकुमार यादवला संधी देण्याबाबत विचार करु शकतात. केदार जाधव सातत्याने अपयशी ठरत असल्याने अजिंक्य रहाणेचाही येथे विचार होऊ शकतो.