ऑनलाईन टीम / ऑकलँड :
न्यूझीलंडमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान जॅसिंडा अर्डर्न यांच्या सेंटर-लेफ्ट लेबर पार्टीने दणदणीत विजय मिळवला.
न्यूझीलंड मीडिया रिपोर्ट्सनुसार, अर्डर्न यांच्या लेबर पक्षाला 49.2 टक्के मते मिळाली. 121 सदस्य असलेल्या संसदेतील बहुमताचा आकडा 61 आहे. लेबर पार्टीला एकूण 64 जागा मिळाल्या. तर ज्युडिथ कॉलिन्स – नॅशनल पार्टीला 27 टक्के मते आणि एकूण 35 जागा मिळाल्या. ॲक्ट न्यूझीलंड पक्षाला 10 जागा मिळाल्या.
2017 पासून सुरू झालेल्या अर्डर्न यांच्या पंतप्रधानपदाच्या पहिल्या टर्ममध्ये मोठा दहशतवादी हल्ला आणि कोरोनाचे संकट आले. पण दरम्यानच्या काळात, अर्डर्न यांच्या सहनशीलतेचे आणि दूरदृष्टीचे जगभरात कौतुक झाले. न्यूझीलंड हा अल्प लोकसंख्येचा देश असला तरी अर्डर्नच्या कार्यकाळात जगातील सर्वोत्तम प्रशासनाचे उदाहरण म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
मतदानापूर्वी झालेल्या ओपिनियन पोलमध्ये अर्डर्नच्या लेबर पक्षाला 46 टक्के मतदारांचा कल दाखवण्यात आला होता. या सर्वेक्षणात त्यांच्या प्रमुख प्रतिस्पर्धी नॅशनल पार्टीला 31 टक्के, ग्रीन पार्टीला 8 टक्के, ॲक्ट न्यूझीलंड पक्षाला 8 टक्के आणि न्यूझीलंडच्या फर्स्ट पार्टीला 3 टक्के जनतेचा पाठिंबा असेल असा अंदाज होता.