वृत्तसंस्था/ ख्राईस्टचर्च
यजमान न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील दुसऱया क्रिकेट कसोटीला रविवारपासून येथे प्रारंभ होत आहे. या मालिकेतील पहिली कसोटी जिंकून न्यूझीलंडने पाकवर आघाडी मिळविली आहे. आयसीसी कसोटी मानांकनात अग्रस्थान मिळविण्यासाठी न्यूझीलंडचे या सामन्यात प्रमुख लक्ष राहील. दुखापतीमुळे पाकचा नियमित कर्णधार बाबर आझम खेळू शकणार नाही.
बाबर आझमच्या अंगठय़ाचे हाड मोडल्याने तो दुसऱया कसोटीसाठी उपलब्ध राहू शकणार नाही, अशी घोषणा पाक संघाचे डॉक्टर सोहेल सलीम यांनी शनिवारी केली. बाबर आझमच्या गैरहजेरीत पाकचे नेतृत्व मोहम्मद रिझवानकडे सोपविण्यात आले आहे. न्यूझीलंडमध्ये दाखल झाल्यानंतर आझमला 14 दिवसांचा कालावधीसाठी क्वारंटाईन व्हावे लागले होते. बाबर आझमच्या दुखापतीमध्ये सुधारणा दिसत असली तरी त्याला पूर्ण तंदुरूस्तीकरिता आणखी काही कालावधी लागेल, असे सोहेल सलीम यांनी सांगितले. पाकमध्ये होणाऱया दक्षिण आफ्रिका बरोबरच्या कसोटी मालिकेत तो उपलब्ध होवू शकेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
न्यूझीलंड संघाने पहिल्या कसोटीत पाकचा 101 धावांनी पराभव केला होता. कर्णधार विलीयमसनच्या शानदार शतकामुळे न्यूझीलंडने हा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेतली. आयसीसीच्या विश्व कसोटी मानांकनात पहिल्या स्थानासाठी न्यूझीलंड, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कडवी चुरस निर्माण झाली आहे. न्यूझीलंडने पाकबरोबरची दुसरी कसोटी जिंकली तर त्यांना आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियन्सशीप स्पर्धेत अंतिम फेरीत स्थान मिळविण्याची संधी मिळू शकेल. या स्पर्धेतील हा अंतिम सामना लॉर्डस् मैदानावर जून महिन्यात खेळविला जाणार आहे. न्यूझीलंड संघाने अलीकडच्या कालावधीत मायदेशात 17 कसोटी सामन्यात आपली अपराजित मालिका राखली आहे. न्यूझीलंडने पाकविरूद्ध दुसरी कसोटी जिंकली तर पहिल्यांदाच हा संघ मायदेशात सलग सहा कसोटी सामने जिंकण्याचा पराक्रम करेल.
दुसऱया कसोटीत न्यूझीलंड संघात चार वेगवान गोलंदाजांचा समावेश राहील. असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सँटेनर या एकमेव फिरकी गोलंदाजाला संधी मिळू शकेल. वेग्नरच्या जागी हेन्रीला संधी देण्यात येणार आहे. ख्राईस्टचर्चची खेळपट्टी पहिल्या दोन दिवसांच्या कालावधीत गोलंदाजांना साथ देईल. त्यानंतर शेवटच्या दिवशी ती फलंदाजीला अनुकूल करू शकेल.
न्यूझीलंड संघ- लेथम, ब्लंडेल, विलीयमसन (कर्णधार), रॉस टेलर, निकोल्स, वेटलिंग, सँटेनर, जेमिसन, साऊदी, हेन्री आणि बोल्ट. पाक संघ- शान मसूद, अबीद अली, अझहर अली, हॅरीस सोहेल, फवाद अलम, मोहम्मद रिझवान (कर्णधार) अश्रफ, यासीर शहा, मोहम्मद अब्बास, शाहीन अफ्रिदी, नसीम शहा.