वृत्तसंस्था/ लंडन /
न्यूझीलंड आणि यजमान इंग्लंड महिला क्रिकेट संघांतील लिसेस्टरमध्ये पहिला वनडे सामना खेळविला जात आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाला अज्ञाताकडून धमकी मिळाल्याने या संघाच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे.
न्यूझीलंड क्रिकेट संघाने तीन दिवसांपूर्वी आपला पाकचा दौरा सुरक्षेच्या कारणामुळे शेवटच्याक्षणी रद्द केला होता. दरम्यान पुढील महिन्यात इंग्लंडचा पुरूष आणि महिलांचा संघ पाकच्या दौऱयावर जाणार होता. पाकमधील सुरक्षा समस्येमुळे इंग्लंडने मंगळवारी हा दौरा रद्द केल्याची घोषणा केल्याने अज्ञात व्यक्तीकडून इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाला ईमेलद्वारे धमकी देण्यात आली आहे. तसेच न्यूझीलंड महिला संघाचे वास्तव्य असलेल्या हॉटेलच्या परिसरात बाँब ठेवल्याची बातमी एका व्यक्तीकडून न्यूझीलंडच्या संघव्यवस्थापन सदस्याला देण्यात आली. यानंतर न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाची सुरक्षा व्यवस्था अधिकच कडक करण्यात आली आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड महिला संघामध्ये पाच सामन्यांची वनडे मालिका खेळविली जात असून इंग्लंडने 2-0 अशी आघाडी मिळविली आहे.