न्यूझीलंडच्या विल यंगला पदार्पणाची संधी मिळणार
वृत्तसंस्था / हॅमिल्टन
यजमान न्यूझीलंड व विंडीज यांच्यातील पहिली कसोटी गुरुवारपासून येथील सेडॉन पार्कवर सुरू होत असून आघाडीचा फलंदाज विल यंग याला न्यूझीलंडकडून कसोटी पदार्पणाची संधी मिळणार आहे. बीजे वॅटलिंगला धोंडशिरेची दुखापत झाली असल्याने तो या सामन्यात खेळणार नाही, असे कर्णधार केन विल्यम्सनने बुधवारी सांगितले. पहाटे 3.30 पासून सामन्याला सुरुवात होणार आहे.
टॉम ब्लंडेलला फलंदाजीत बढती मिळणार असून वॅटलिंगच्या गैरहजेरीत तो यष्टिरक्षणाची जबाबदारीही सांभाळणार आहे. टॉम लॅथम व यंग हे सलामीला खेळणार आहेत. 2019 मध्येच यंगला बांगलादेशविरुद्ध कसोटी पदार्पणाची संधी मिळणार होती. पण ख्राईस्टचर्चमधील मशिदीत समूहावर झालेल्या गोळीबारामुळे तिसरी व शेवटची कसोटी रद्द करण्यात आल्याने त्याची ही संधी हुकली होती. ‘त्याला आता उत्तम संधी मिळाली असून त्याचा तो निश्चितच लाभ घेईल,’ असे विल्यम्सन म्हणाला. 28 वर्षीय यंगने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये 10 शतकांसह 43.76 च्या सरासरीने धावा जमविल्या आहेत. गेल्याच आठवडय़ात त्याने विंडीजविरुद्ध झालेल्या अ संघातून त्याने शेवटचे शतक नोंदवले आहे.
उर्वरित संघरचनेची घोषणा गुरुवारी सकाळी करण्यात येणार असून अष्टपैलू डॅरील मिशेल, मिशेल सँटनर, ट्रेंट बोल्ट, काईल जेमीसन, साऊदी, नील वॅग्नर यांच्यात 5 स्थानासाठी चुरस असेल.
सगळेच खेळाडू उत्तम असल्याने त्यांची निवड करणे ही एक गोड समस्या असल्याचे विल्यम्सन यावेळी म्हणाला. न्यूझीलंडने टी-20 मालिकेत विंडीजवर 2-0 असा विजय मिळविला असून ते आता दोन कसोटीच्या मालिकेला सुरुवात करणार आहेत. विंडीज संघही या मालिकेसाठी सज्ज झाला असून इंग्लंडमध्ये झालेल्या कसोटीनंतर ते प्रथमच कसोटी खेळणार आहेत. टी-20 मालिकेत झालेल्या पराभवाची परतफेड कसोटीत करण्याचा ते प्रयत्न करणार आहेत. याशिवाय न्यूझीलंडमध्ये विंडीजचे रेकॉर्ड चांगले नसल्याने त्यातही सुधारणा करण्याचा ते प्रयत्न करणार आहेत.