ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिका दौरा लांबणीवर पडल्यामुळे चित्र स्पष्ट
दुबई / वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियाने कोव्हिड-19 च्या प्रकोपामुळे आपला दक्षिण आफ्रिका दौरा लांबणीवर टाकल्यानंतर उद्घाटनाच्या विश्व कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचणारा न्यूझीलंड पहिला संघ ठरला. ऑस्ट्रेलियाने आफ्रिका दौरा लांबणीवर टाकल्याने न्यूझीलंडची 70 टक्के गुणवारी कोणीही मागे टाकू शकणार नाही, हे स्पष्ट झाले आणि त्याचवेळी ते अंतिम फेरीत पोहोचल्याचेही निश्चित झाले. न्यूझीलंडचा प्रतिस्पर्धी भारत असेल की इंग्लंड, हे उभय संघातील शुक्रवारपासून खेळवल्या जाणाऱया मालिकेनंतर निश्चित होणार आहे.
‘चॅम्पियनशिपमध्ये न्यूझीलंड अंतिम फेरीत खेळेल. न्यूझीलंडचा प्रतिस्पर्धी कोण असेल, हे भारत-इंग्लंड मालिकेत निश्चित होईल’, असे ट्वीट करत आयसीसीने या वृत्ताला दुजोरा दिला.
गुणतालिकेत सध्या भारताच्या खात्यावर सर्वाधिक 71.7 टक्के गुणवारी आहे. न्यूझीलंडच्या खात्यावर 70 तर ऑस्ट्रेलिया 69.3 टक्के गुणवारीसह तिसऱया स्थानी आहे. इंग्लंडचा संघ 65.2 टक्के गुणवारीसह चौथ्या स्थानी आहे.
गुणांची टक्केवारी प्रत्येक संघाने मिळवलेल्या विजयाच्या प्रमाणात निश्चित केली जाते. भारताला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील स्थान निश्चित करायचे असेल तर मालिकेत किमान दोन सामने जिंकावे लागतील. त्याचप्रमाणे हे समीकरण उलथवून टाकण्यासाठी इंग्लंडला किमान 3 सामने जिंकत मालिकाविजयावर शिक्कामोर्तब करावे लागेल. दोन्ही संघांना यात यश आले नाही व बरोबरी राहिली तर ऑस्ट्रेलियाला फायनलमध्ये पोहोचण्याची संधी निर्माण होईल. या कसोटी चॅम्पियनशिपची अंतिम लढत दि. 18 जूनपासून लॉर्डस्वर खेळवली जाणार आहे.
कोव्हिड-19 च्या रुद्रावतारामुळे ऑस्ट्रेलियाचा द.आफ्रिका दौरा लांबणीवर
सिडनी ः दक्षिण आफ्रिकेतील कोव्हिड-19 च्या नव्या उद्रेकामुळे ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा आगामी दौरा अनिश्चित कालावधीकरिता लांबणीवर टाकला आहे. ऑस्ट्रेलियन संघ या दौऱयात 3 कसोटी सामने खेळणे अपेक्षित होते.
दक्षिण आफ्रिकेत सध्या अराजक स्थिती असून कोव्हिड-19 ची दुसरी लाट तेथे आली आहे. त्या पार्श्वभूमीवर आफ्रिका दौरा करणे अजिबात शक्य नाही, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अंतरिम अध्यक्ष निक हॉकली यांनी हा निर्णय जाहीर करताना स्पष्ट केले. ‘सध्याच्या प्रतिकूल स्थितीत दक्षिण आफ्रिका दौऱयावर जाणे आमचे खेळाडू, प्रशिक्षण पथकातील सदस्य व अन्य सर्व संलग्न घटकांच्या दृष्टीने आरोग्यासाठी धोकादायक आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने सर्व नियोजन केले, आखणी केली, याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. मात्र, सध्याच्या घडीला हा दौरा पूर्वनियोजित रुपरेषेनुसार होणे शक्य नाही, असे आम्ही त्यांना कळवले आहे’, याचा हॉकली यांनी पुढे उल्लेख केला.
निर्णयाचा ऑस्ट्रेलियालाच फटका
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा दौरा लांबणीवर टाकल्यामुळे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियालाच याचा फटका बसला. ही मालिका होत नसल्यामुळे ऑस्ट्रेलियाने कसोटी चॅम्पियनशिपमध्ये अंतिम फेरीत पात्र होण्याची शक्यता जवळपास मावळतीच्या उंबरठय़ावर पोहोचली आहे. जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत गुणतालिकेतील पहिले दोन संघ पात्र ठरणार आहेत. जागतिक कसोटी स्पर्धेला पात्र ठरणे महत्त्वाचे होते. मात्र, त्याचबरोबर खेळाडूंची सुरक्षितता त्यापेक्षा अधिक महत्त्वाची आहे, असे हॉकली यांनी यावेळी नमूद केले आहे.
दक्षिण आफ्रिकेतील एखादी मालिका लांबणीवर टाकली जाण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी, इंग्लंडने देखील दक्षिण आफ्रिकेचा दौरा अर्ध्यावरच सोडून दिला होता. इंग्लंडचा संघ ज्या हॉटेलमध्ये वास्तव्यास होता, तेथेच काही जणांना कोरोना झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर इंग्लिश संघ तातडीने मायदेशी परतला होता.
याशिवाय, गतवर्षी ऑस्ट्रेलियाने देखील आपला बांगलादेश दौरा लांबणीवर टाकला होता. या दौऱयाचा सुधारित कार्यक्रम अद्याप जाहीर केला गेलेला नाही.
जागतिक कसोटी मालिकेची गुणतालिका
संघ / मालिका / मालिकाविजय /सामने / विजय / पराभव / अनिर्णीत / गुण / बळी-धावा प्रमाण
भारत / 5 / 4 / 13 / 9 / 3 / 1 / 430 / 1.619
न्यूझीलंड / 5 / 3 / 11 / 7 / 4 / 0 / 420 / 1.281
ऑस्ट्रेलिया / 4 / 2 / 14 / 8 / 4 / 2 / 332 / 1.392
इंग्लंड / 5 / 4 / 17 / 10 / 4 / 3 / 412 / 1.251
द. आफ्रिका / 4 / 1 / 10 / 3 / 7 / 0 / 144 / 0.677
पाकिस्तान / 6 / 2 / 11 / 3 / 5 / 3 / 226 / 0.785
श्रीलंका / 4 / 0 / 8 / 1 / 6 / 1 / 80 / 0.586