वृत्त संस्था/ शारजा
आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंड संघाने उपांत्य फेरीकडे आपली वाटचाल करताना शुक्रवारी झालेल्या गट-2 मधील सामन्यात दुबळय़ा नामिबियाचा 52 धावांनी दणदणीत पराभव केला.
नामिबियाने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी दिली. न्यूझीलंडने 20 षटकात 4 बाद 163 धावा जमविल्या. त्यानंतर नामिबियाला 20 षटकात 7 बाद 111 धावापर्यंत मजल मारता आली.
न्यूझीलंडच्या डावात नीशम आणि फिलीप्स यांनी शानदार फलंदाजी फलंदाजी केली. त्यांची सलामीची जोडी गप्टील-मिशेल यांनी आक्रमक फटकेबाजी केली. पहिल्या 4.1 षटकांत न्यूझीलंडने 1 बाद 30 धावा जमविल्या होत्या. विझेने गप्टीलला बाद केले. त्यानंतर कर्णधार विल्यम्सनने मैदानात प्रवेश केला. पॉवर प्लेमधील खेळात शेवटच्या दोन षटकात न्यूझीलंडच्या या जोडीने प्रत्येकी एक चौकार नोंदविला. नामिबियाच्या स्कोलने मिशेलला बाद केले.
दरम्यान कर्णधार विल्यम्सन आणि कॉनवे यांनी 38 धावांची भागीदारी केली. इरासमुसने विल्यम्सनला बाद केले. त्यानंतर पुढील चेंडूवर कॉनवे धावचीत झाला. 14 व्या षटकाअखेर न्यूझीलंडने 4 बाद 87 धावा जमविल्या होत्या. नीशम आणि फिलीप्स यांनी 5 व्या गडय़ासाठी 41 चेंडूत अभेद्य 76 धावांची भागीदारी केल्याने न्यूझीलंडने 20 षटकाअखेर 4 बाद 163 धावा जमवल्या. नीशमने नाबाद 35 तर फिलीप्सने नाबाद 39 धावा जमविल्या. नामिबियातर्फे स्कोल, इरासमुस, विझे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल नामिबियाने 20 षटकात 7 बाद 111 धावा जमविल्या. न्यूझीलंडतर्फे साऊदी-बोल्ट यांनी नामिबियाच्या फलंदाजांना फटकेबाजीपासून रोखले. साऊदीने 15 धावात 2 तर बोल्टने 20 धावात 2 गडी बाद केले. नामिबियातर्फे लिनगेनने 25 तर ग्रीनने 23 धावा केल्या. या स्पर्धेत गट-2 मधून पाकिस्तान संघ सर्वप्रथम उपांत्य फेरीत पोहोचला असून या गटातून गुणतक्त्यात न्यूझीलंडचा संघ दुसऱया स्थानावर आहे.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड 20 षटकात 4 बाद 163 (फिलीप्स नाबाद 39, नीशम नाबाद 35, स्कोल 1-15, इरासमुस आणि विझे प्रत्येकी एक बळी). नामिबिया 20 षटकात 7 बाद 111 (लिनगेन 25, ग्रीन 23, साऊदी 2-15, बोल्ट 2-20).