ऑनलाईन टीम / वेलिंग्टन :
न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामधील आघाडीची मीडिया कंपनी असलेल्या ‘स्टफ’ची केवळ एक डॉलरला विक्री करण्यात आली आहे. कोरोनामुळे आर्थिक डबघाईला आल्याने या कंपनीची कवडीमोलात विक्री झाल्याची माहिती कंपनीच्या मालकानेच दिली आहे.
स्टफकडून न्यूझीलंडमधील अनेक नामांकित वर्तमानपत्र व नियतकालिकांची छपाई केली जाते. ‘स्टफ’ या नावाची एक स्वतंत्र वेबसाईटदेखील आहे. परंतु, लॉकडाऊनमुळे त्यांच्या कंपनीचे आर्थिक व्यवहार पूर्णपणे थांबले. याशिवाय त्यांनी ज्या अमेरिकी कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले होते. त्या सर्व कंपन्या डबघाईला गेल्या. त्यामुळे स्टफला कोट्यवधींचे नुकसान झाले. डबघाईला आलेली ही कंपनी खरेदी करण्यास कोणीही तयार नव्हते. अखेर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिनेड बाउचर यांनी केवळ एक न्यूझीलंड डॉलरला ही कंपनी विकत घेतली.
या कंपनीत 900 कर्मचारी असून त्यापैकी 400 पत्रकार आहेत. ऑस्ट्रेलियाच्या ‘नाइन एंटरटेन्मेंट’च्या मालकीची ही कंपनी करोना संकटाच्या आधीपासूनच आर्थिक आव्हानांना तोंड देत होती. त्यामुळे ‘नाइन एंटरटेन्मेंट’ ने ‘स्टफ’ ची विक्री करुन मालकी हक्क सोडण्याचा निर्णय घेतला. या महिन्याअखेर हा व्यवहार पूर्ण होईल, असे कंपनीचे सीईओ बाउचर यांनी सांगितले.