ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमधील न्यूट्रलायझिंग ॲन्टिबॉडी घटल्याने त्यांना कोरोनाचा पुन्हा संसर्ग होत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेची सहसंस्था असलेल्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक्स ॲण्ड इंटिग्रेटेड बायोलॉजी’ने कोरोना रुग्णांचे सर्वेक्षण केले. सतरा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतील 10 हजार 427 जणांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये ‘सीएसआयआर’च्या 40 प्रयोगशाळांमधील कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी आणि त्यांच्या नातेवाईकांचा समावेश आहे. त्यामधील 20 टक्के लोकांच्या शरीरातील न्यूट्रलायझिंग ॲन्टिबॉडी घटल्याने त्यांना पुन्हा संसर्ग झाल्याचे समोर आले.
कोरोनाचा संसर्ग होण्यापासून ॲन्टिबॉडी संरक्षण देतात. न्यूट्रलायझिंग ॲन्टिबॉडी अनेक लोकांमध्ये गेल्या सहा महिन्यात कमी झाल्या आहेत. त्यामुळे या लोकांना पुन्हा संसर्ग होऊ लागला आहे, असे या अहवालात म्हटले आहे.